Join us

निर्यातक्षम 'आरा' द्राक्षवाणाची नाशिकच्या काळारामाला करणार आरास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 15:59 IST

आयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मुर्तींच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण..

आयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मुर्तींच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.२२) ‘सह्याद्री फार्म्स’च्या शेतकऱ्यांच्या बागेतून ताजी, रसाळ रंगीत द्राक्षे  येथील काळारामाच्या चरणी दाखल होतील.  यावेळी मंदिरातील गाभाऱ्यात नव्या 'आरा' या द्राक्ष वाणांची आरास करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून जागतिक दर्जाचे पेटंट द्राक्ष वाण प्रथमच भारतात आयात केले आहेत. या नव्या आरा रंगीत द्राक्ष वाणांची यशस्वी लागवड नाशिक भागात झाली असून हीच उत्तम गुणवत्तेची गोड, रसाळ द्राक्षे श्री काळारामाच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. आराशीनंतर हा  द्राक्षांचा प्रसाद भाविकांबरोबरच परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम या सेवाभावी संस्थांना देण्यात येईल.

द्राक्षउत्पादक प्रयत्नशील

द्राक्षशेती ही नेहमीच वेगवेगळ्या आव्हानांतून जात राहिली आहे. द्राक्ष उत्पादकांचा मागील १४ वर्षांचा प्रवास हा सततच्या नैसर्गिक आपत्तींचा आणि विविध संकटांनी भरलेला राहिला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिद्दी द्राक्ष उत्पादक सतत प्रयत्नशील राहिले आहेत. 

त्यातुनच सह्याद्री फार्म्सने  जगप्रसिद्ध ग्राफा या ब्रिडींग कंपनीशी सहकार्य करार करुन  पेटंट असलेल्या वाणांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा केला. या वाणांची यशस्वी लागवड इथल्या मातीत झाली आहे. यातून द्राक्ष उत्पादकांचाही दीर्घकाळाचा वनवास संपला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अयोध्येत होणाऱ्या भव्य राममुर्ती प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर या नव्या आरा रंगीत द्राक्षवाणांच्या खुडणीचा व विक्रीचा शुभारंभ होत आहे. त्याचाच भाग म्हणून काळारामास ही द्राक्षे अर्पण करण्यात येणार आहेत.

रंगीत द्राक्षवाणांचा शुभारंभ‘‘शेतकऱ्यांनी स्विकारलेले नवे तंत्रज्ञान आणि त्यांची अपार मेहनत यांना आलेली गोड, रसाळ फळे म्हणजे ही द्राक्षे आहेत.  आज ही द्राक्षे शेतकऱ्यांकडून श्रीरामाच्या चरणी अर्पण केली जात आहे. या मुहुर्तावर या आरा रंगीत द्राक्ष वाणांच्या नव्या हंगामाचा शुभारंभ होत आहे. येणारा हंगाम राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभदायी ठरो हीच श्रीरामाच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत.’’- विलास शिंदे,अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,सह्याद्री फार्म्स, मोहाडी, जि. नाशिक

टॅग्स :द्राक्षेराम मंदिरअयोध्यानाशिक