Join us

दुधाळ जनावरांच्या संख्येत वाढ, मात्र बैल झाले कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 3:47 PM

यांत्रिकीकरण, चारा - पाणी देखभाल आदी कारणाने बैलांची संख्या घटली.

फकिरा देशमुख

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. २०२०-२१ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एकूण १,४४,०९३ इतकी जनावरे आहेत. आता २०२४ मध्ये गणना करण्यात येणार आहे. त्यानंतर आणखी जनावरे वाढण्याची शक्यता आहे.

अलीकडे भोकरदन तालुक्यात गेली चार वर्षात दुधाळ जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, त्यातुलनेत बैल व भाकड जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट देखील झाल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. उत्कर्ष वानखेडे यांनी संगितले. 

पूर्वी ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाकडे किमान दहा जनावरे होती, त्यात गायींची संख्या पाचच्या वर असायची. परंतु, आता दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होत आहे. शेतीची कामेही यंत्रांच्या साह्याने केली जात आहेत. शिवाय जनावरांचा चारा - पाणी, शेण काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी बैल पाळण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पूर्वी प्रत्येक घरी गाय आणि बैल किंवा म्हैस दिसून येत होती. परंतु, त्यांच्या चारा-पाणी करण्यामुळे तरुण पिढींने जनावरे पाळण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

एका एकरातील टरबूज पिकातून मिळाले पावणे दोन लाखांचे उत्पन्न 

सर्वाधिक गाय आणि म्हैशींची संख्या

• एकूणच जालना जिल्ह्याचा विचार करता, भोकरदन तालुक्यात गाय आणि म्हशींची सर्वाधिक संख्या आहे. यात गाय ८८,१७२, तर म्हशींची १६,५३९ संख्या एवढी आहे.• आता शेतातील सर्व कामे यंत्राच्या साह्याने होत असल्यामुळे तालुक्यात केवळ ३० हजार बैलांची संख्या असल्याचे समोर आले आहे.

तालुक्यासाठी ८९००० लाळ खुरकुत लस

सध्या बदलत्या वातावरणामुळे जनावरांना ताप येणे, खाणे-पिणे बंद होणे, तोंडात जिभेवर फोड येतात. लाळ गळणे व नाकातून स्राव वाहतो. संसर्गामुळे कळपातील गुरांनाही आजाराची लागण होते. त्यामुळे तालुक्याला लाळ खुरकुत लस ८९००० प्राप्त झाली होती. तीच लस वापरण्यात आली आहे.

पशुधनातील लाळ खुरकत आजार FMD : लक्षणे आणि उपाय

कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागण्यास मदत

आता घरोघरी दररोज किमान अर्धा ते एक लिटर दूध घेतले जात आहे. या दुधाला ६० रुपये लिटरचा भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांनी शेतीला जोडधंदा म्हणून गायी, म्हशी पाळण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीबरोबर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागण्यास मदत होत आहे. - राजेंद्र तळेकर, शेतकरी, भोकरदन

टॅग्स :दुग्धव्यवसायफराह खानशेतकरीदूध