Pune : "ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या कृषी सहाय्यकांना काम करण्यास अडचणी येऊ नयेत आणि कामाची गती वाढावी यासाठी आम्ही कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देणार आहोत" अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. ही घोषणा करत असताना कृषी सहाय्यकांना एक अटही घातली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात प्रथमच राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळा आज पुण्यातील बालेवाडी येथे पार पडली. कृषी विभागाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये कृषी मंत्री, कृषी विभागाचे प्रधान सचिव आणि आयुक्तांपासून कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यासाठी शेतीतील तंत्रज्ञान, गटशेती, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी विस्तार या विषयावर कार्यशाळा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या राज्यात शेतकऱ्यांना असणाऱ्या प्रश्नांवर किंवा अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांनी मनापासून काम करावे. आपण शेतकऱ्यांच्या हितासाठीच याठिकाणी काम करत आहोत. तर त्यांच्या उन्नतीचाच आपण विचार केला पाहिजे असं मत कृषीमंत्र्यांनी कृषी अधिकाऱ्यांना संबोधित करताना व्यक्त केले आहे.
काय आहे अट?"कृषी संघटनेच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्हाला लॅपटॉपची सुविधा मिळावी, त्यासोबतच मोबाईल सिम कार्ड आणि त्यासाठी लागणाऱ्या रिचार्जचा खर्च मिळावा, यासोबतच पदनामाच्या संदर्भात त्यांच्या मागण्या आहेत. पण त्यांच्या मागण्या पूर्ण करत असताना त्यांच्याकडून कामाची अपेक्षापूर्ती करावी अशा गोष्टी आम्ही त्यांच्याकडून वदवून घेतल्या आहेत. अशा प्रकारची संमती अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडून घेतली असून राज्य शासन लवकरात लवकर यासंदर्भात कामाला लागेल." अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.