Join us

उसाचा हंगाम संपत आला! 'या' कारखान्यांकडे FRPची रक्कम अजूनही बाकीच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 7:36 PM

काही कारखान्यांनी मागच्या एक ते दीड महिन्यांपासूनची एफआरपी रक्कम दिली नसल्याने अशा कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून कारवाई केली जात आहे. 

- दत्ता लवांडे

पुणे : उसाचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात असून एका महिन्याच्या आत हंगाम संपण्याची चिन्हे आहेत. पण अजूनही राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी उसाच्या एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. तर काही कारखान्यांनी मागच्या एक ते दीड महिन्यांपासूनची एफआरपी रक्कम दिली नसल्याने अशा कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून कारवाई केली जात आहे. 

दरम्यान, फेब्रुवारी अखेर राज्यभरात  ८२४.८० लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. तर या उसाचे २५ हजार ५०६ कोटी रूपये एफआरपी (तोडणी आणि वाहतूक खर्च पकडून) कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देणे होते. तर यातील ९६.६८ टक्के रक्कम म्हणजे २४ हजार ६६० कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांचे ८४६ कोटी एफआरपी कारखान्यांनी देणे अजूनही बाकी आहे. 

तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता एफआरपीची ९१.९० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली असून राज्यातील २०६ साखर कारखान्यांपैकी केवळ ९२ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्याचबरोबर ८० टक्क्यापेक्षा जास्त रक्कम देणाऱ्या कारखाने ६४ तर ३१ साखर कारखान्यांनी ६० ते ८० टक्क्यापर्यंत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. दरम्यान, राज्यातील १९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या एकूण एफआरपीमधून केवळ ६० टक्क्यापर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. 

राज्यातील २०६ साखर कारखान्यांपैकी ११४ साखर कारखान्यांकडे अजून शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम बाकी आहे. तर येणाऱ्या काही दिवसांतच कारखान्यांचे गाळप थांबणार असून कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तर जे कारखाने शेतकऱ्यांच्या पैसे देण्यात १५ दिवसांपेक्षा जास्त वेळ लावतील अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात  येत आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसाखर कारखानेऊस