Join us

agro advisory : ऊस, हळद पिकासाठी विद्यापीठाने जारी केला कृषी सल्ला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 13:28 IST

Agro Advisory : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञांनी कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. वाचा सविस्तर

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून चौथ्या व पाचव्या दिवशी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील २४ तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील ३ दिवसात मराठवाड्याच्या दक्षिण भागात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात किमान तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर पुढील ३ दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून चौथ्या व पाचव्या दिवशी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील २४ तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील ३ दिवसात मराठवाड्याच्या दक्षिण भागात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात किमान तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर पुढील ३ दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ०६ फेब्रुवारीपर्यंत पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त ०७ ते १३ फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन 

ऊस :ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड १५ फेब्रुवारी पर्यंत करता येते.

हळद :हळद पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे.

हरभरा :हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना  ५ % निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अझाडीरेकटीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी. तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५% - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा फ्लुबेंडामाईड २०% - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे.

करडई

करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% १३ मिली किंवा असिफेट ७५% १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

उन्हाळी तीळ

उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करता येते. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी ३० X १० सें.मी. किंवा ४५ X ७.५ सें.मी. अंतरावर ३ ते ४ सें.मी. खोलीवर करावी. बी जास्त खोल पेरल्यास उगवण कमी होते. पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी एकेटी-101, एकेटी-103, जेएलटी-408, एकेटी-64, एनटी-11-91 या वाणांपैकी वाणाची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% एससी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १०% ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी (टोमॅटो, वांगे, मिरची) भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे तर वेलवर्गीय व भेंडी पिकाची लागवड करावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक संगोपन गृहात रात्री व दिवसाच्या तापमानात बदल होत आहेत. रात्रीचे तापमान कमी राहत असेल तर रूम हिटर किंवा कोळशाच्या शेगडीच्या सहाय्याने तापमान वाढवावे. आवश्यकतेनुसार तापमानवर २२ ते २५ अंश.सेल्सिअस तापमान व ८०-८५ टक्के आर्द्रता असेल तरच रेशीम किटक व्यवस्थीत तुती पाने खातात व वाढ व्यवस्थीत होते.वाढीच्या चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेत काही लहान अळ्या असतील तर त्यांना वेचून घ्यावे व जमीनीत गाडून टाकावे. कोष करते वेळी पण २५ अंश सेल्सिअस तापमान व ६५ टक्के आर्द्रता ठेवणे आवश्यक राहते. संगोपनगृहात हवा खेळती असावी व क्रॉस व्हेंटीलेशनची व्यवस्था करावी.

पशुधन व्यवस्थापन

जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे तसेच दर पंधरा दिवसाला गोठा व गोठ्याचा परिसरात किटकनाशकाची फवारणी करावी व गोठ्यातील खड्डा व भेगा असतील तर त्या बुजवून घ्याव्यात व गोठा व गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Dharashiva Mango : द्राक्षापाठोपाठ धाराशिवच्या 'मँगो' चा डंका; केशर निर्यातीत अग्रेसर राहणार वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेती