Pune : महाराष्ट्रातील पहिलीच राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळा आज (ता. ०९) पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे पार पडली. यासाठी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त डॉ. सुरज मांढरे आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कृषी सहाय्यकांचा सामावेश होता. यामध्ये विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले.
खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना फायद्याचे काम करणे, योजनांचा प्रचार, प्रसार करणे आणि एकंदरितच कृषी विभागाचा आगामी कृती आराखडा व त्यावरील चर्चासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना भविष्यात संधी उपलब्ध असलेल्या विषयांवर या कार्यक्रमात आज दिवसभर चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये शेतीमध्ये येऊ घातलेले एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान, शेतीमधील नव्या संधी आणि आव्हाने, कृषी माल प्रक्रिया उद्योगामध्ये असलेल्या नव्या संंधी आणि आव्हाने, गटशेती, कीडनाशक अवशेषमुक्त कृषी उत्पादन पद्धती, आगामी कृती आराखडा या विषयावर विविध मान्यवरांसोबत चर्चा करण्यात आली.
राज्याचे कृषीमंत्री यांनी यावेळी बोलताना अनेक घोषणा केल्या. ज्यामध्ये कृषी अधिकारी संघटनेच्या मागणीनुसार पदनाम बदलणे, लॅपटॉप देणे यावर कृषीमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. यासोबतच कृषी विभागातील बदल्यांच्या अधिकारांचेही विकेंद्रीकरण केले असून मी फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये बदल्यांमध्ये लक्ष घालेले अन्यथा कृषी सचिव आणि आयुक्त यांनाच हे अधिकार दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.