Join us

खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहिर केलेल्या ४० तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार निविष्ठा अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 14:31 IST

खरीप हंगाम-२०२३ मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात मदत देण्यात येते.

राज्यातील ४० तालुक्यांमध्ये खरीप २०२३ हंगामाकरिता दुष्काळ जाहिर करण्यात आलेला आहे. जून ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

सदर तालुक्यातील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने ३ हेक्टर मर्यादेत निधी देण्याचे विचाराधीन होते.

खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहिर केलेल्या ४० तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रु. २४४३२२.७१ लक्ष (अक्षरी रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

महत्वाचेअ) एका हंगामात एक वेळेस होणार मदत.ब) सन-२०२३ च्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व व पूर यामुळे झालेल्या ज्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच शेतीपिकांच्या नुकसानीकरिता या शासन निर्णयाव्दारे पुन्हा मदत अनुज्ञेय नाही. क) शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.२७.०३.२०२३ व दि.०९.११.२०२३ नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार पावसाळी हंगाम-२०२३ मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करूनच होणार मदत.

टॅग्स :दुष्काळखरीपपीकराज्य सरकारसरकार