नाशिक : जूनपासून खरिपाचा हंगाम (Kharip Season) सुरू होणार असताना, शेतकऱ्यांच्या खिशाला आधीच खर्चाची झळ बसायला सुरुवात झाली आहे. रासायनिक खतांचे दर (Fertilizers Rate) झपाट्याने वाढू लागले असून, बीटी बियाण्यांच्या किमतीही चढू लागल्या आहेत. आता कीटकनाशकांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मालेगाव तालुक्यात १५ हजार हेक्टरवर फळबाग व पालेभाज्यांची (Vegetable Farming) लागवड होते. येत्या खरिपासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. सध्या डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताची किंमत प्रति बॅग १,३५० रुपये आहे. मात्र, लवकरच या दरात १५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे १०:२६:२६ हे मिश्र खतदेखील गेल्या काही आठवड्यांत तब्बल २५५ ते २७५ रुपयांनी महाग झाले आहे. पूर्वी १,४७० रुपयांना मिळणारे हे खत आता १७२५ ते १७५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय कीटकनाशकांच्या किमतीतही ५ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
बियाणांच्या दरवाढीमुळे कोट्यवधींचा खर्च :केंद्र सरकारने बीटी बियाण्यांच्या प्रति बॅग किमतीत ३७ रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. जिल्ह्यातील दरवर्षीची खतांची मागणी पाहता युरिया १५४०५ मेट्रिक टन, डीएपी ११४४ मेट्रिक टन, एमओपी १५२० मेट्रिक टन, एनपीके २२ हजार ६०० मेट्रिक टन, एसएसपी २४ हजार ९०० मेट्रिक टन अशी आहे. '१०:२६:२६ खताच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या इतर खतांचे दर स्थिर असले, तरी येत्या काळात त्यांच्याही किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.' - खत विक्रेते
शेतकऱ्यांनी इतर सुरक्षित व पर्यावरणस्नेही खतांच्या पर्यायांचा विचार केला पाहिजे. शासनाने विकसित केलेला नॅनो युरिया हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे दरवर्षी निर्माण होणारी युरियाची टंचाई टाळता येईल.- भीष्मा पाटील, कृषी अधिकारी, पंचायत समिती