Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : शेतमालावर गावातच प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावे; शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:03 IST

गावातील शेतमालावर गावातच प्रक्रिया उद्योग निर्माण होणे अंत्यत गरजेचे असल्याचे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. (Agriculture News)

Agriculture News : 

अकोला :  भविष्यात नगदी पिकांसह तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्र वाढ अपेक्षित आहे. गावातील शेतमालावर गावातच प्रक्रिया उद्योग निर्माण होणे अंत्यत गरजेचे असल्याचे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांसोबत वार्तालाप करताना केले. 

महाराष्ट्र राज्य शेतमाल उत्पादन आणि फळपिकांसाठी देश पातळीवरील आघाडीचे राज्य असून पारंपरिक शेतीला या राज्यातील शेतकरी आता आधुनिकतेची जोड देत आहेत. यामागे कृषी विद्यापीठांचे योगदान दिसून येत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

यंदा विद्यापीठ शिवार फेरीच्या माध्यमातून व्यावसायिक शेतीचे शाश्वत आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतल्याने भविष्यात नगदी पिकांसह तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्र वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. गाव पातळीवरच प्रक्रिया उद्योग निर्माण होणेदेखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

अकोला येथे जिल्हा दौऱ्यासाठी आगमन झाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राला भेट दिली व विविध आधुनिक उपक्रमांची माहिती करून घेतली. 

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, हेमलता अंधारे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कुलसचिव सुधीर राठोड, जिल्हाधिकारी अजित कुंभार, महाबीज व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, यांच्यासह विद्यापीठ संशोधक, शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.

पीक प्रात्यक्षिक बघितले!

राज्यपालांनी जिवंत पीक प्रात्यक्षिक क्षेत्राचे प्रत्यक्ष अवलोकन केले तसेच विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान तथा शेतकरी वर्गापर्यंतचा प्रचार प्रसार आणि व्यावहारिक उपयोगितादेखील शास्त्रज्ञांकडून जाणून घेत समाधान व्यक्त केले.

शेती तंत्रज्ञानाचे अवलोकन करण्यासाठी शिवार फेरी !

• यंदा तब्बल २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी जिवंत पीक प्रात्यक्षिके साकारत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे, तसेच अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करीत फायद्याच्या शेतीचे अनेक अनेक पैलू प्रत्यक्ष बघता यावे.

• या उद्देशाने कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन केले होते होते, अशी माहिती कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी राज्यपालांना दिली.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेती