Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन एकत्रित येऊन अवजारे बॅकांची स्‍थापना करावी

By बिभिषण बागल | Updated: August 30, 2023 13:02 IST

आजच्या काळात कमी-कमी होत चाललेले शेतीचे क्षेत्रफळ, मजुरांची कमतरता आणि वाढता मजुरीचा खर्च पाहता शेतकऱ्यांनी आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळावे.

आजच्या काळात कमी-कमी होत चाललेले शेतीचे क्षेत्रफळ, मजुरांची कमतरता आणि वाढता मजुरीचा खर्च पाहता शेतकऱ्यांनी आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळावे. शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन एकत्रित येऊन अवजार बॅकांची स्‍थापना करावी, असा सल्‍ला कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक २८ ऑगस्‍ट ते ३० ऑगस्‍ट दरम्‍यान वनामकृवि आणि सीएनएच इंडस्ट्रियल इंडिया, नवी दिल्‍ली यांच्‍या व्‍यावसायिक सामाजिक जबाबदारीच्‍या माध्‍यमातुन कौशल्‍य विकास-कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, या प्रशिक्षणाचे उदघाटनाप्रसंगी ऑनलाईन माध्‍यमातुन अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्‍हणुन विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांची उपस्थिती होती तर व्‍यासपीठावर उस्‍मानाबाद कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. कमलाकर कांबळे, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक इंजि. सचिन सूर्यवंशी, सीएनएच इंडीया कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक धनराज जाधव, लातुन कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन शिंदे, तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा. वर्षा मरवाळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होते. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवांनी स्‍वत: कडे असलेलया ट्रॅक्टर व तत्सम कृषि औजारांची वेळोवेळी निगा राखणे अत्यंत महत्वाचे असून त्‍यांचा कार्यक्षम वापर करावा. येणाऱ्या काळाची शेती ही आधिुनिक औजारांमुळेच शेती असुन ड्रोन व रोबोट्स तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.

संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवसरकर म्हणाले की, सद्या मराठवाड्यात सोयाबीनचा पेरा वाढलेला असून यामध्ये बीबीएफचा वापर केल्यास सोयाबीन उत्पादनामध्ये १५ ते २० टक्के वाढ शक्य आहे. परंतू शेतकऱ्यांना पेरणीच्या दरम्यान बीबीएफ उपलब्ध होत नाहीत. त्याकरीता गावपातळीवर शेतकऱ्यांनी औजार बॅंकेची संकल्पना राबवावी. भारतात पहिली क्रांती संकरीत वाणांची, दुसरी कांती कमी उंचीच्या विविध पिकांची झालेली आहे तर तिसरी क्रांती आता यांत्रिकीकरणामुळे होणार आहे. पिकांची फेरपालट, वाणाच्या काल मर्यादेनुसार जमिनीची निवड, एकात्मिक कीड नियंत्रण आणि यांत्रिकीकरण अशी उत्तम शेतीची चर्तुसुत्री त्‍यांनी सांगितली.

मार्गदर्शनात प्रा. सचिन सूर्यवंशी म्हणाले की, शेतीच्या विभागणीमुळे आजचा शेतकरी हा अल्पभुधारक, अत्यल्पभूधारक होत चालला असून त्याला आधुनिक महागडी शेती औजारे परवडणे शक्य नाही, त्यामुळे गावकुशीतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावपातळीवर औजारे बॅंक सुरू करणे अत्यंत महत्वाचे आहे. ज्यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांनी शेती औजारे वापरायला मिळतील. तर  सहयोगी अधिष्ठाता डॉ. कमलाकर कांबळे म्हणाले की, उस्मानाबाद लातूर ही जिल्हे सद्य यांत्रिक शेतीमध्ये सर्वात पुढे असून जिल्हयातील ऊसतोड व इतर मशागतीची कामे विविध कृषि औजारांमुळे वेळेवर होत आहेत. तसेच येत्या काही दिवसात शेतीमध्ये रोबोटचा वापर शक्य आहे.

प्रशिक्षणाच्या सत्रात लातूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन शिंदे यांनी ड्रोनची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. सीएनएच इंडीया चे श्री. धनराज जाधव यांनी कंपनीच्या विविध शेती व तत्सम औजारांचे प्रात्यक्षिक व माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा मरवाळीकर यांनी केले. सुत्रसंचालन श्रीमती अपेक्षा कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. भगवान आरबाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. विजय जाधव, डॉ. दर्शना भुजबळ, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. नकुल हरवाडीकर, श्री. सखाराम मस्के, श्री. शिवराज रूपनर, श्री. मोरेश्वर राठोड व श्री. पंकज क्षिरसागर आदिनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :शेतकरीशेतीकृषी विज्ञान केंद्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठतुळजापूर