Join us

Agriculture Expo : स्वामीनाथन् कृषी प्रदर्शनात देशातील सर्वांत उंच बैलाचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:05 IST

Agriculture Expo : येत्या २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान आष्टी येथे राज्यस्तरीय डॉ. स्वामीनाथन कृषी प्रदर्शनाचे आयोजन

Agriculture Expo : येत्या २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान आष्टी येथे राज्यस्तरीय डॉ. स्वामीनाथन कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली येथील व देशातील सर्वांत उंच ४१ लाख रुपये किमतीचा खिलार कोसा जातीचा सोन्या बैल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत आनंद चॅरिटेबल संस्था संचलित श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालयांच्या वतीने व शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील सर्वांत मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शन आष्टी येथे होत आहे.

गेल्यावर्षी झाली होती ८ कोटींची उलाढाल

गेल्यावर्षी हे प्रदर्शन उशिरा झाले होते. परंतु, यावेळी ऑगस्टमध्येच प्रदर्शन होत असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात काय पिके घेता येतील, त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन प्रदर्शनातून मिळणार आहे. १ लाख २५ हजार शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला होता. मागील वर्षी १०० स्टॉल होते. यंदा १५० स्टॉल असतील. मागील प्रदर्शनात ७ ते ८ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी हा आकडा वाढणार आहे.

रोज लकी शेतकरी अन् खवय्यांसाठी मेजवानी 

कृषी प्रदर्शनासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांमधून दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येईल. लकी शेतकऱ्यांना शेती उपयोगी भेटवस्तू देण्यात येतील. शेवटच्या दिवशी बंपर लकी ड्रॉ काढून विजेत्याला बक्षीस दिले जाईल. खवय्यांसाठी विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील खाद्यपदार्थ खाण्यासाठी व विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध असणार आहेत. तसेच रोज सायंकाळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. हे प्रदर्शन मोफत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आरसूळ उपस्थित होते.

रोज कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन

कृषी प्रदर्शनात चार दिवस दररोज दुपारी १२:०० ते २:०० या वेळेत कृषी तज्ज्ञांकडून जिरेनियम शेती, खेकडा पालन, गोमातेच्या शेणापासून विविध वस्तू कशा निर्माण करायच्या, यांची माहिती मिळणार आहे. महिलांनी घरबसल्या घरगुती व्यवसाय करणे, विविध ट्रॅक्टर व अवजारे, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक मशिन, कुक्कुटपालन तसेच बँकेतून घ्यावयाचे कर्ज तसेच गांडूळ खत बनविण्याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती