Join us

दोन दिवसांनी मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांनी काय करावे?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 16, 2024 12:15 PM

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानंतर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला...

राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार असले तरी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार १९ मार्च रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यात तापमान चाळीशीपार जात असल्याने बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढला आहे. तर जमीनीतील ओलावा कमी झाला आहे. 

मराठवाडयात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, फळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळबागेत फळझाडाच्या आळयात आच्छादन कराण्याचा कृषी सल्ला परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिला आहे.

शेतकऱ्यांनी असे करावे पीक व्यवस्थापन

  • दिनांक 19 मार्च रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. 
  • मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. 
  • वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. 
  • कमाल व किमान तापमानातील तफावत ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. 
  • सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. 
  • काढणी केलेल्या हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. 
  • कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

  • काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. 
  • संत्रा/मोसंबी संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. 
  • जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. 
  • नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. 

भाजीपाला

  • काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. 
  • कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. 
  • सध्याच्या उष्ण वातावरणामूळे मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टॅग्स :हवामानतापमानमराठवाडापाऊसनांदेडहिंगोली