Join us

Keli Pik Vima : केळी विम्यातील प्रशासकीय अडसर झाला दूर, जिल्हाधिकारी काय म्हणाले पहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:35 IST

Keli Pik Vima : त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव : जिल्ह्यात सुमारे १ लाख ८० हजार लाख हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड होत आहे. हवामानाधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत उन्हाळ्यातील अतिउच्च तापमानामुळे (हीट-ट्रिगर) झालेल्या नुकसानीसाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत दावे वितरित होणे अपेक्षित असताना हवामान केंद्रांची प्रमाणित आकडेवारी उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना विमा रकमेपासून वंचित राहावे लागले. मात्र आता प्रशासकीय अडसर दूर झाल्याने लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून लवकरच भरपाई वाटपाची प्रक्रिया सुरु होणार आहे.

कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया (एआयसी) आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यातील कराराअभावी विम्याचे दावे प्रलंबित होते. महावेध उपक्रमांतर्गत महसूल मंडळांमधून मिळणारी हवामान आकडेवारी आता विमा कंपन्यांना थेट स्कायमेटकडून खरेदी करावी लागते.

याच प्रक्रियेत सुधारित आर्थिक अटी ठरविण्यास विलंब झाल्याने एआयसीकडून स्कायमेटला देयके अडकली व परिणामी आकडेवारी पोर्टलवर अपलोड होऊ शकली नाही. त्यामुळे जळगावातील शेतकऱ्यांचे विमा दावेही अडचणीत आले होते. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली होती.

प्रशासकीय अडसर दूर, स्कायमेटला दिला कार्यारंभ आदेशहा प्रशासकीय अडथळा अखेर दूर झाला आहे. एआयसीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने २४ सप्टेंबर २०२५ रोजी स्कायमेटला अधिकृत कार्यारंभ आदेश दिला आहे. या आदेशानुसार जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील २१५ हवामान केंद्रांची आकडेवारी निर्धारित दराने उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

कमाल-किमान तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता व वाऱ्याचा वेग यांची प्रमाणित नोंद पोर्टलवर सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील हवामान केंद्रांची आकडेवारी निरंतरपणे उपलब्ध होणार आहे. ती आकडेवारी पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर विमा कंपनीकडून दावे गणना करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वितरण सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

'एआयसी'ने स्कायमेटशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण दूर झाली आहे. नुकसान भरपाईपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून लवकरात लवकर लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव.

English
हिंदी सारांश
Web Title : Banana Crop Insurance: Administrative Hurdles Cleared, Claims Process to Begin

Web Summary : Jalgaon banana farmers will soon receive crop insurance payouts after administrative delays involving weather data. A deal between AIC and Skymet resolves the issue, enabling claims processing and distribution.
टॅग्स :केळीपीक विमापाऊसशेती क्षेत्र