Join us

द्राक्षांच्या घडाला चढला लाल गुलाबाचा साज; हिरव्या, काळ्या, लाल द्राक्षांनी फळबाजारात बहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 08:56 IST

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्याने द्राक्षाच्या घडाला खोचले गुलाब...क

आंबट-गोड द्राक्षांची चव बहुतेकांना आवडते. त्यात द्राक्षांचा घडा हातात धरून तो खाण्याची मजा काही औरच असते. बाजारात हातगाड्या हिरव्या, काळ्या, लाल द्राक्षांच्या घडाने बहरून गेल्या आहेत. शहागंजात जिकडे पाहावे तिकडे द्राक्षेच विक्रीला आल्याचे दिसून येत आहे. काही विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी द्राक्षाच्या घडाला गुलाबाचा साज चढविला आहे. यामुळे हिरव्या, काळ्या रंगाच्या घडात गुलाब खोचल्याने द्राक्षाचा हारच जणू हातगाडीवर लटकविल्यासारखे वाटत आहे.कुठून आले द्राक्ष ?छत्रपती संभाजीनगर शहरात सोलापूर मार्गावरून द्राक्षे मोठ्या प्रमाणात येत आहे. यात हिरव्या, काळ्या व लाल द्राक्षांचा समावेश आहे.

जाधववाडी कृउबा समितीच्या अडत बाजारात दररोज १० टनांपेक्षा अधिक द्राक्षे विक्रीला येत आहेत. एकट्या शहागंजात दररोज १०० कॅरेट (एका कॅरेटमध्ये २० किलो) द्राक्ष विकली जात आहेत.

हिरव्या द्राक्षाला पसंतीकाळी द्राक्षे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असली तरी ग्राहक हिरव्या द्राक्ष खरेदीलाच जास्त पसंती देत आहेत. बाजारात द्राक्षे ६० ते १०० रुपये किलो दरम्यान विकत आहेत. यात हिरवी द्राक्षे ५० ते ७० रुपये तर काळी ७० ते १०० रुपये किलोने विकत आहेत.

द्राक्ष खाण्याचे फायदे

द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन 'सी' असते. यामुळे संसर्गाशी लढण्यास ते मदत करते.

द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. यामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखता येते.

द्राक्षांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आटोक्यात येते.

द्राक्षाचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घडाला खोचले लाल गुलाब

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याच हातगाडीवरील द्राक्ष ग्राहकांनी खरेदी करावे, यासाठी प्रत्येक जण कल्पना लढवित असतो. सध्या गुलाब स्वस्त असल्याने विक्रेत्यांनी द्राक्षाच्या घडाला लाल गुलाब खोचल्याने ते आणखी आकर्षक झाले.- जुनेद चांद खान, फळ वितरक

टॅग्स :द्राक्षेबाजारशेतकरी