Join us

शिंगाडा शेतीचा नवा पर्याय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 15:28 IST

शिंगाडा शेती करण्यासाठी आता एक नवीन पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे. 

भंडारा जिल्ह्यात पारंपरिक धान उत्पादनाला पर्याय म्हणून आणि शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी शिंगाडा शेती हा पर्याय उपलब्ध झाला आहे. बाजारात सध्या शिंगाडयाला खूप मागणी आहे.त्यामुळे हीच गरज ओळखून भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील खापरी रोड येथे बालाजी शिवरकर यांनी पारंपरिक शेती न करता शिंगाडा शेती करत आहेत. त्या शेतीसाठी आवश्यक ते प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यावर प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.बालाजी शिवरकर यांच्या शिंगाडा शेतीला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. शिंगाड्याचे पीक व त्याची उपयुक्तता तसेच त्यापासून व्यावसायिक उत्पादने करण्यासाठीची प्रक्रिया याबाबत त्यांनी साकोली कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. उषा डोंगरवार यांच्याशी चर्चा केली. या ठिकाणी शिंगाडा शेतीची पाहणी करताना पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व अधिकारी यांनी शेताची पाहणी करून  शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने, मत्स्य उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उषा डोंगरवार यांनी केले. जिल्हा नियोजन समितीतून या प्रकल्पासाठी नावीन्यपूर्ण प्रयोगातून निश्चितच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच त्या शिंगाड्यावरील प्रक्रिया उद्योगासाठीदेखील त्यांना प्रशिक्षण व आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शिंगाडा पौष्टिक घटक■ भंडारा जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असून, या पाण्यावर धानाच्या पारंपरिक शेतीशिवाय शिंगाडा उत्पादन करावे. शिंगाड्याचे पीठ हे उपवासासाठी वापरले जाते. तसेच शिंगाड्यात पौष्टिक घटक असल्याने त्याचे अन्नमूल्य खूप जास्त आहे. भंडाऱ्याची ओळख शिंगाड्याचा जिल्हा म्हणून व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी दर्जेदार प्रजाती या जिल्ह्यात उत्पादित करण्यात याव्यात. तसेच शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. 

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती