Join us

या तालुक्यातील ४२ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७ कोटी दुष्काळी अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 10:56 AM

बार्शी तालुक्यातील ४१ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या ३७०५४ हेक्टर क्षेत्रासाठी ३७ कोटी ४७ लाख रुपये अनुदान आले आहे. आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत.

बार्शी तालुक्यातील ४१ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या ३७०५४ हेक्टर क्षेत्रासाठी ३७ कोटी ४७ लाख रुपये अनुदान आले आहे. आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. दुष्काळी अनुदानाचे पैसे जमा होऊ लागले लागले असले, तरी अद्याप यलो मोझॅकने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मात्र मदत आलेली नाही.

मागील वर्षी अत्यल्प आणि खंडित स्वरूपाचा पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास वाया गेली होती. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यांसाठी मंजूर केलेले अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

जिरायती शेतकऱ्यांना ८ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर, बागायतीसाठी १७ हजार, तर फळबागेसाठी २२५०० इतके अनुदान देण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात दुष्काळाची घोषणा केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी दुष्काळाच्या अनुदानाला मुहूर्त मिळाला आहे.

तीन हेक्टरपर्यंत मिळणार आर्थिक मदतखरीप हंगाम २०२३ च्या दुष्काळासाठी वाढीव क्षेत्राच्या निर्णयानुसार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, यावरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होणे आवश्यक आहे.

अद्यापि १३,६०० शेतकरी आधार प्रमाणीकरण करणे बाकीबँक खात्याला आधार कार्ड तसेच मोबाइल क्रमांक लिक केलेला असावा अशा प्रकारे अटी शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या नसतील तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून या अटी पूर्ण करून घ्याव्यात, अन्यथा विविध प्रकारच्या अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. यादीत नावे असलेल्या १३६०० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

अनुदान वाटप प्रलंबितयादीत नावे असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अनेकांचे क्षेत्र हे सामायिक आहे. त्यामुळे त्यातील कोणाच्या नावावर अनुदान जमा करायचे याची संमती न आल्याने असे अनुदान वाटप करणे प्रलंबित आहे.

यलो मोझॅक बाधित शेतकरीबार्शी तालुक्यात ६८ हजार ४१२ शेतकऱ्यांचे ७३ हजार ५४८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यांच्या याद्याही शासनाकडे सादर केल्या आहेत. त्यांचे ६२ कोटी ५० लाख अनुदान येणे बाकी आहे. दुष्काळी मदत किंवा यलो मोझॅक अनुदान या दोन्हीपैकी एकच मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. एकंदरीत ज्यांना दुष्काळी अनुदान आले आहे, त्यांना ही मदत मिळणार नाही.

टॅग्स :दुष्काळशेतीशेतकरीराज्य सरकारखरीपबँकआधार कार्डबार्शी