Join us

शेतकऱ्यांना गायीच्या दुधाचे दोन्ही टप्प्यांतील ४ कोटी अनुदान मिळाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 9:19 AM

४ कोटी १८ लाख ४१ हजार ९४५ रुपये अनुदान वितरित

राज्य शासनाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील तीन हजार ९१० पशुपालकांना गायीच्या दूध अनुदानाचा लाभ मिळाला आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांतील पाच रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

गायीच्या दुधाला २५ ते २८ रुपये प्रतिलिटरचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठी हानी सहन करावी लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दुग्धविकास मंत्रालयाने पशुपालकांना गायीच्या दुधासाठी पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार अनुदानाचा लाभ घेण्यासाठी १३ हजार ९२८ गायीचे टॅगिंग करून घेण्यात आले होते.

यानुसार आता दोन्ही टप्प्यांतील तीन हजार ९१० शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग झाले आहे. बीड जिल्ह्यात सहकारी व खासगी दूध संकलन केंद्रांकडे जमा करण्यात आलेल्या दुधाचे अनुदान वितरित झाले आहे. या अनुदानाचे बीड जिल्ह्यासाठी ४ कोटी १८ लाख ४१ हजार ९४५ रुपये मिळाले आहेत. त्यातील ८३ लाख ८६ हजार ८३ लिटर दुधासाठी हे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

दोन्ही टप्प्यांतील अनुदान वर्ग

राज्य शासनाने १० जानेवारी ते ११ फेब्रुवारी व १२ फेब्रुवारी ते १३ मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी गायीच्या दुधाला पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. याचा फायदा सहकारी व खासगी दूध संकलन केंद्रांतर्गत जिल्ह्यातील तीन हजार ९१० शेतकऱ्यांना झाला आहे. दोन्ही टप्प्यांतील शेतकऱ्यांना दुधाच्या अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगली; ग्रामीण डाक जीवन विमा योजना

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीदूधसरकारी योजना