विष्णू वाकडे
मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांची यंदा पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली फळगळ आणि यंदाच्या कवडीमोल बाजारभावामुळे मोसंबी उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने २८ हजार ६०८ हेक्टरवरील मोसंबीचे क्षेत्र धोक्यात आहे.
त्यामुळे मोसंबी उत्पादकांसह मोसंबी संशोधन केंद्र आणि कृषी विभाग हे आव्हान कसे पेलणार, हा मोठा प्रश्न उभा आहे. जिल्हा कृषी विभागाच्या माहितीनुसार, २८ हजार ६०८ हेक्टरवर मोसंबीची लागवड करण्यात आली आहे. यापैकी सुमारे ८० टक्के बागा सध्या उत्पादनक्षम अवस्थेत आहेत.
गेल्या तीन-चार वर्षापासून मोसंबीमध्ये फळगळ गंभीर समस्या बनली असून, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कोलमडला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार मोसंबीला फक्त १० ते १५ रुपये प्रतिकिलो इतकाच दर मिळत आहे. हा भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही.
त्यामुळे समाजमाध्यमांवर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जेसीबीने बागा उखडतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे मोसंबीला मिळालेले जीआय नामांकन टिकून राहणार का हा प्रश्नच आहे.
जालना जिल्ह्यातील मोसंबी
तालुका | क्षेत्रफळ |
जालना | ३०१० |
बदनापूर | ८५६० |
अंबड | ९१०० |
घनसावंगी | ७२०० |
परतूर | ४०३ |
मंठा | १४१ |
जाफराबाद | ८६ |
भोकरदन | १०८ |
एकूण | २८६०८ |
९ हजार शंभर हेक्टर मोसंबी क्षेत्र एकट्या अंबड तालुक्यात
जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात मोसंबीचे क्षेत्र आहे. मात्र अंबड तालुक्यात सर्वाधिक ९ हजार १०० हेक्टर मोसंबीच्या बागा आहेत.
मोसंबीला सध्या भावच नाही. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नाही. मेहनत करून उत्पादन घेतो; पण निसर्ग आणि बाजार दोन्ही हात दाखवतात. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. - अंबर घनघाव, व्यापारी.
मोसंबी उत्पादक पूर्णपणे संपला आहे. फळगळीचा प्रश्न संशोधन केंद्रालाही सोडवता आलेला नाही. संशोधन केंद्राने आधी स्वतःच्या बागांतील फळगळ थांबवून दाखवावी. झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाई द्यावी. - रवींद्र गोल्डे, व्यापारी.
विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियमित कृषी विस्तार उपक्रम राबविले जातात. फळगळ, बहर नियोजन, खत व्यवस्थापन या विषयांवर सातत्याने संशोधन सुरू आहे. यामुळे दीर्घकालीन उपाय सापडतील, अशी अपेक्षा आहे. - डॉ. संजय पाटील, प्रमुख शास्त्रज्ञ, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर.
व्यापाऱ्यांनाही मोठा फटका
• मोसंबी उत्पादकांइतकाच व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मोसंबीची गुणवत्ता कमी झाली.
• जालन्यातून परराज्यात मोसंबी पाठवताना वाहतूक विलंबामुळे फळ सडते. परिणामी व्यापाऱ्यांना निम्मा दर मिळतो, असे व्यापारी सांगतात.
Web Summary : Jalna's mosambi production is threatened by fruit drop and low market prices, impacting 28,000+ hectares. Farmers are uprooting orchards due to losses. Experts seek solutions.
Web Summary : जालना में मोसंबी उत्पादन फल गिरने और कम बाजार मूल्यों से खतरे में है, जिससे 28,000+ हेक्टेयर प्रभावित हैं। किसान नुकसान के कारण बागों को उखाड़ रहे हैं। विशेषज्ञ समाधान ढूंढ रहे हैं।