Join us

कुक्कुटपालनात कमी खर्चातील 'हे' सोपे उपाय करा आणि बर्ड फ्लू टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:41 IST

Bird Flu : कुक्कुटपालन करत असतांना बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, परिणामी पशुपालकाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

कुक्कुटपालन करत असतांना बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, परिणामी पशुपालकाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

या कारणास्तव, बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावापासून बचाव करणे हे प्रत्येक कुक्कुटपालकासाठी अत्यंत आवश्यक आहे. योग्य काळजी, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या घातक रोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो.

याच अनुषंगाने आज आपण Avian Influenza म्हणजेच बर्ड फ्लू टाळण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊया, जे आपल्या कुक्कुटपालन व्यवसायाला सुरक्षित आणि यशस्वी ठेवण्यास मदत करतील.

बर्ड फ्लू म्हणजे काय?

बर्ड फ्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे जो मुख्यतः परदेशी पक्ष्यांद्वारे पसरतो. हा रोग संसर्गजन्य असून, एकदा पसरल्यास पक्ष्यांचे आरोग्य खराब होणे, मृत्यू होणे परिणामी उत्पादनक्षमता कमी होणे यासारखे गंभीर परिणाम दाखवतो.

बर्ड फ्लू टाळण्यासाठी महत्त्वाचे सोपे उपाय

• कुक्कुटपालन शेड उंच ठिकाणी असावा.

• शेडच्या किमान २०० मीटर परिसरात नदी, तलाव यांसारखे पाण्याचे स्रोत नसावेत.

• शेडच्या आजूबाजूला हवा खेळती राहण्यासाठी झाडे असावीत, पण ती झाडे फारशी उंच नसावीत.

• शेडच्या प्रवेशद्वारावर चुन्याची पावडर शिंपडावी, जेणेकरून कामगारांचे पाय बाहेरील विषाणूंपासून सुरक्षित राहतील.

• शेडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी काम करतांना व बाहेर वावरतांना वेगवेगळे कपडे घालावेत आणि तोंडावर मास्क लावावे. 

• कुक्कुट पक्ष्यांमध्ये काही असामान्य लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकांनी फक्त आवश्यकतेनुसारच शेडमध्ये प्रवेश करावा. अन्यथा बाहेरूनच निरीक्षण करणे अधिक सुरक्षित ठरते.

• शेड मध्ये मृत झालेल्या पक्ष्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. त्यासाठी जाळून टाकणे किंवा गाडून टाकण्याची पद्धत वापरावी.

• कुक्कुटपालन करत असतांना शेड जवळ बदक, वराह यांचे पालन करू नये. कारण या प्राण्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणू सहज आढळतो आणि त्यांच्या विष्ठेद्वारे संक्रमण होण्याची शक्यता असते.

• कुक्कुटपालन करत असतांना एकाच प्रकारचे पक्षी एका शेडमध्ये ठेवावेत. उदाहरणार्थ बॉयलर आणि लेयर पक्षी एकत्र ठेवू नयेत.

• कुक्कुट पक्ष्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची दर सहा महिन्यांनी तपासणी करावी. ज्यातून टीडीएस आणि C3 CHU योग्य आहे की नाही हे समजू शकेल.

• पक्ष्यांना पोषणयुक्त आणि शुद्ध आहार द्यावा. बुरशीयुक्त आहार टाळावा, कारण तो रोगप्रतिकारक शक्ती कमी करू शकतो.

• शेडमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी आणि त्यानुसार पुढील नियोजन करावे.

डॉ. असरार अहमदसहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन (विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर).

हेही वाचा : वेळेवर करा फक्त दूध तपासणी मस्टाटीसची होईल गोठ्यातून सुट्टी

 

टॅग्स :पोल्ट्रीबर्ड फ्लूशेतकरीशेती क्षेत्रशेती