Join us

कोंबड्यांच्या लसीकरणापूर्वी व लसीकरण करताना घ्यावयाची काळजी

By बिभिषण बागल | Updated: July 20, 2024 17:00 IST

नियमितपणे लसीकरण न केल्यास रोगाची लागण होते. Poultry ठराविक रोगाचा प्रसार होण्यापूर्वी शिफारशीनुसार नियोजित लसीकरण करणे आवश्यक आहे. कोंबड्यांच्या लसीकरणापूर्वी व लसीकरण करताना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती पाहूया.

कोंबड्यांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. नियमितपणे लसीकरण न केल्यास रोगाची लागण होते. ठराविक रोगाचा प्रसार होण्यापूर्वी शिफारशीनुसार नियोजित लसीकरण करणे आवश्यक आहे. कोंबड्यांच्या लसीकरणापूर्वी व लसीकरण करताना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती पाहूया.

लसीकरणापूर्वी घ्यावयाची काळजी

  • सर्वप्रथम कोंबडीच्या समुदायाला रोगाची लागण झाली असेल, तर त्या वेळेचे पक्ष्याचे वय लक्षात घ्यावे. त्याचप्रमाणे प्रक्षेत्रामध्ये प्रसार झालेल्या रोगाविषयीची माहिती, जवळच्या प्रक्षेत्रात असलेल्या पक्ष्यांत रोगांची माहिती आणि पक्ष्यांमध्ये अगोदर लसीकरण केल्याची माहिती करून घ्यावी, तसेच पक्ष्यांचे व्यवस्थापन, जैवसुरक्षितता आणि पक्ष्यांवर येणारा वातावरणाचा ताण याचाही विचार करावा.
  • लसींच्या उपयुक्ततेनुसार आणि निर्माण करण्याच्या पद्धतीनुसार त्यांची वर्गवारी करता येते. लस ही जिवंत रोगजंतूंवर प्रयोगशाळेत प्रक्रिया करून शीतशुष्क बनवली असल्याने आणि ती टोचल्याने पक्ष्यात रोग येऊ शकत नाही; परंतु प्रतिकारशक्ती मात्र निर्माण होते.
  • पक्ष्यांमध्ये दिली जाणारी लस एकूण तीन प्रकारची असते. पहिला प्रकार म्हणजे जिवंत अतिसूक्ष्म विषाणूंपासून बनवलेली लस त्याला आपण 'लाइव्ह व्हॅक्सिन' म्हणतो. दुसरा प्रकार म्हणजे निर्बल आणि अशक्त झालेल्या जंतूंपासून बनवलेली लस त्याला 'ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन' म्हणतात. तिसरा प्रकार म्हणजे प्रक्रियेने मृत झालेल्या जंतूंपासून तयार केलेली लस म्हणजेच 'किल्ड व्हॅक्सिन', लस ही पक्ष्यांच्या शरीरात वेगवेगळ्या मार्गाने दिली जाते. उदा. स्नायूंमध्ये म्हणजेच इन्ट्रामस्क्युलर, कातडीखाली म्हणजेच सबक्युटॅनियस, डोळ्यात थेंब टाकून त्याला आपण इंट्राऑक्युलर म्हणतो. नाकात टाकून म्हणजेच इन्ट्रानेझल. पिण्याच्या पाण्याद्वारे, पंखांच्या पातळ पाळ्यातून यालाच आपण विंग बेग पद्धत असे संबोधतो.

लसीकरण करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

  • सर्वप्रथम लसीकरण करताना शीत साखळीची विशेष खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. लस थंड राहण्यासाठी फ्रिज, रेफ्रिजरेटर, धर्मासमध्ये, बर्फात साठवून ठेवावी. उष्णता लागल्यास लस खराब होते. कोणतीही लस ७ अंश सेल्सिअस खाली असलेल्या तापमानास साठवावी.
  • लसीकरण नेहमी थंड वातावरणात करायला पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांत लसीकरण पहाटे अथवा संध्याकाळच्या वेळेस केल्याने पक्ष्यांना त्रास होत नाही.
  • लसीकरणासाठी लागणारी उपकरणे उदा. सीरिंज, सुया, पात्रे वापरण्यापूर्वी पाण्यात उकळून त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. लस नेहमी ताजी तयार केलेली, दोन तासांच्या आत वापरावी.
  • लसीकरण झाल्यानंतर राहिलेल्या रिकाम्या बाटल्या, शिल्लक लस जमिनीत गाडून टाकावी. लसीकरण झाल्यानंतर पक्ष्यांना 'जीवनसतस्त्व ई' पाण्यातून द्यावे, त्यामुळे लसीकरणाचे निर्माण झालेले ताण कमी होण्यास मदत होते.
  • मान्यताप्राप्त कंपनीकडूनच लस खरेदी करावी. लस तयार करण्यात आलेली तारीख, बॅच नंबर, एक्सपायरी डेट इत्यादी डेट पाहूनच लस खरेदी करावी.
  • पिण्याच्या पाण्याद्वारे लस देण्यापूर्वी कमीत कमी चार तास पिण्याचे पाणी पक्ष्यांना देऊ नये. असे केल्याने सर्वच पक्षी तहानलेले असल्यामुळे लसयुक्त पाणी पितात, त्यामुळे सर्व पक्ष्यांना लस पोचते. पिण्याच्या पाण्याद्वारे लस द्यावयाची असल्यास त्या पाण्यात जंतुनाशक मिसळू नये. कारण त्यामुळे लसीची परिणामकारकता कमी होते.
  • रोगाचा प्रसार झाल्यानंतर लस टोचणे निरुपयोगी ठरते, त्यामुळे पक्ष्यांच्या निरोगी अवस्थेतच त्यांना लस द्यावी. लसीकरण करताना पक्ष्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • जवळच्या भागात मानमोडी रोगाचा प्रसार झाल्यास आपल्या पक्षी समुदायास तो रोग पसरू नये म्हणून मानमोडीची लस द्यावी.
  • लसीकरण नियोजित वेळेनुसार करावे. लसीकरणामुळे पक्ष्यांतील रोगावर प्रतिबंध घालता येतो. लसीकरणामुळे कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहून मांस आणि अंडी उत्पादनात वाढ होते.

डॉ. व्ही. डी. लोणकर, डॉ. ए. एस. कदमसहाय्यक प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग,क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ

टॅग्स :शेतीशेतकरीव्यवसायआरोग्य