गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील किष्टापूर (वेल) येथील गोंडवाना स्वयंसहायता समूह बचतगटाने (Bachat Gat) एक पाऊल पुढे टाकत कुक्कुटपालनातून व्यवसाय करीत उंच भरारी घेतली आहे. इतर महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. जिद्द, मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर व्यक्ती कोणताही व्यवसाय उभारू शकते.
महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे असून, अहेरी तालुक्यातील किष्टापूर (वेल) येथे दहा महिलांनी मिळून गोंडवाना स्वयंसहायता समूह गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) ने दिलेल्या संधीचे सोने करीत कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभारला आहे.
या बचतगटात एकूण १० महिला सदस्य असून, त्या एकजुटीने हा व्यवसाय सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, गावातील सर्व बचतगटांच्या महिलांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे किष्टापूर या गावात शेडचे बांधकाम करून देण्यात आले आहे. गोंडवाना स्वयंसहायता समूह बचतगटाने या ठिकाणी व्यवसाय थाटला आहे.
८० हजार रूपयांतून सुरू केला व्यवसायपहिल्यांदा या महिलांनी ८० हजार रुपये खर्च करून नागपूर येथून गावरान कोंबड्यांची पिल्ले आणली. केवळ तीन महिन्यांत पिल्लांची वाढ झाली अन् मागणी वाढली. अल्पावधीतच ठोक आणि चिल्लर विक्री करून त्यांना मोठा फायदा मिळाला. त्यानंतर या महिलांनी संबंधित व्यक्तीला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून रक्कम भरून परत पिल्लांची ऑर्डर दिली.
रात्रीच्या सुमारास पहारापक्ष्यांच्या वयाच्या सुरुवातीचे चार आठवडे अतिशय महत्त्वाचे असतात. सुरुवातीच्या वयाच्या या काळात संरक्षित ठिकाणी पक्ष्यांची वाढ केली. कुक्कुटघरामध्ये पुरेशी ऊब निर्माण करून विद्युत दिवे लावण्यात आले. पिल्लांसाठी पाणी व खाद्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे, दररोज त्यांची काळजी घेत रात्रीच्या सुमारास चोरीला जाऊ नये म्हणून राखणदेखील केली जात आहे.