कुक्कुट पक्ष्यांमध्ये विविध आजार हे निरनिराळ्या प्रकारच्या जिवाणू, विषाणूमुळे होत असतात. तसेच पक्ष्यांना होणारे बहुतेक आजार हे सांसर्गिक असल्याने याची लागण एका पक्ष्यापासून दूसऱ्या पक्ष्याला लवकर होते आणि यामुळे संपूर्ण पक्ष्यांचे आरोग्यही धोक्यात येते.
अशावेळी पक्षी रोगाला बळी पडू नये म्हणून पक्ष्यांना प्रतिबंधात्मक औषध दिले जाते याला लस म्हणतात. तसेच लस देण्याच्या प्रक्रियेला लसीकरण असे म्हणतात.
यामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून विविध रोगापासून पक्ष्यांचा बचाव होतो तसेच पक्ष्यांची होणारी मरतुक कमी होते आणि कुक्कुटपालकाचे आर्थिक नुकसान टाळले जाते. याच अनुषंगाने जाणून घेऊया कुक्कुट पक्षांच्या लसीकरणाचे नियम अर्थात लसीकरण करतांना घ्यायची काळजी.
लसीकरण करताना घ्यावयाची काळजी
• लस खरेदी करताना त्यावरील वापरण्याची अंतिम तारीख तपासूनच लस खरेदी करावी.
• लस घेते वेळी ती योग्य तापमानात ठेवल्याची खात्री करून घ्यावी.
• लसीच्या बाटल्यांची वाहतूक ही थर्मासमध्ये बर्फ ठेवून करावी.
• लसीकरणाची वेळ शक्यतो सकाळी लवकर अथवा सायंकाळी असावी.
• कुक्कुट पक्षांना लस डोळ्यांमधून, त्वचेमधून, पाण्यातून व स्नायुंमधून दिली जाते.
• लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी.
• लसीकरण करते वेळी लसीच्या बाटली सोबत आलेले निर्जंतुक पाणी हे लसीच्या बाटलीमध्ये टाकावे आणि ते एकजीव होईपर्यंत मिसळावे.
• पक्षांना लसीकरण करण्यासाठी छोट्या ड्रॉपरचा वापर करावा.
• बाटलीवर दिलेल्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करावे.
• एकदा वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये.
• लसीकरणासाठी वापरात येणारी सर्व उपकरणे निर्जंतुक करावीत.
• वापरून उरलेली लस, बाटल्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.
• सर्व पक्षांना एकाच वेळी लसीकरण करावे तसेच फक्त निरोगी पक्ष्यांनाच लसीकरण करावे.
• एका वेळी एकच लस द्यावी. एकाच वेळी अनेक लस दिल्यास पक्षांमध्ये त्याचा विपरीत परिणाम होऊन नुकसान होण्याची शक्यता असते.
हेही वाचा : कुक्कुटपालनात कमी खर्चातील 'हे' सोपे उपाय करा आणि बर्ड फ्लू टाळा