लातूर : उदगीरमधील रामनगर परिसरातील कोंबड्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत बर्ड फ्लूचा रोखण्यासाठी प्रसार आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी बुधवारी जिल्ह्यातील उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांची तहसीलदारांनी बैठक घ्यावी व त्यांना बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती द्यावी, अशा सूचना केल्या.
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी भूपेंद्र बोधनकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस गटविकास मुख्याधिकारी, अधिकारी, अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विविध विभागावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यानुसार सर्वानी समन्वयाने काम करावे.
कोंबड्यांचे नमुने तपासा
• पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोंबड्यांचे वैद्यकीय नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी केल्या.
• तसेच जैवसुरक्षा, पोल्ट्री फार्मचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या.
भीती बाळगू नये...
• नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठेही पक्ष्यांची असाधारण मरतूक आढळल्यास पशुसंवर्धन अथवा १९६२ या टोल क्रमांकावर तातडीने माहिती द्यावी.
• प्रतिबंधित क्षेत्र आणि अलर्ट झोनमध्ये देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
१ किमी परिसर प्रतिबंधित
• रामनगरच्या एक किलोमीटर परिघात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील ४१ कोंबड्या, अंडी व पक्षी खाद्याची तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असून, परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
• तसेच १० किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
• लातूर जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म, घरगुती ५० पेक्षा अधिक कोंबड्या असल्यास त्यांचीही नोंदणी बंधनकारक आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले.