Join us

मत्स्यपालन व्यवसायाबाबतची एकदिवशीय कार्यशाळा संपन्न, युवकांचा चांगला प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 17:15 IST

मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

महाराष्ट्र मत्स्यबीज उत्पादन केंद्र व महाराष्ट्र बायोफ्लॅक फिश फर्मिंग यांच्या वतीने सागर राऊत आणि त्यांच्या पत्नी यांनी  बायोफ्लोक व शेततळ्यामध्ये आधुनिक पद्धतीने मत्स्य पालन कसे करावे? निगा कशी राखावी, त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न कसे मिळवता येईल, त्याचबरोबर एकूणच मत्स्य पालन व्यवसायाची इत्यंभूत माहिती या दाम्पत्यांनी उपस्थितांना देत मार्गदर्शन केले. 

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे मत्स्यपालन व्यवसाय एकदिवशीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात मत्स्य पालन उद्योजक सागर राऊत यांनी मत्स्य पालन व्यवसायाविषयी इत्यंभूत माहिती उपस्थितांना दिली. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत 60 टक्क्यापर्यंत अनुदान मिळू शकते, सात टॅंकसाठी साडेचार लाख रुपये अनुदान मिळते. 25 टॅंकसाठी 15 लाख रुपये अनुदान मिळते. 50 टॅंकसाठी 30 लाख रुपये अनुदान मिळते. इतरही अनेक योजना मत्स्य व्यवसाय उद्योगांमध्ये समाविष्ट आहे. तसेच कुठल्याही महिलांचे नावे अनुदान घेतल्यास 60 टक्के अनुदान मिळते. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीतील कोणालाही शेततळे किंवा बायोप्लेक्सद्वारे मत्स्यपालन करायचं असल्यास 60 टक्के अनुदान मिळते. तसेच जनरल प्रवर्गासाठी 40 टक्के अनुदान मिळते. 

आपल्याकडे असलेल्या शेततळ्यामध्ये बायो फ्लेक्समध्ये कुठल्या पद्धतीचा, कोणती प्रजाती, वाणाचा मासा तयार होऊ शकतो,  निर्माण केला जाऊ शकतो. कमी खर्चामध्ये कुठला मासा तयार होतो?  मार्केटमध्ये कुठल्या माशाला जास्त मागणी आहे, याची परिपूर्ण माहिती या शिबिरात देण्यात आली. चांदवड तालुका हा दुष्काळी तालुका असून पारंपारिक शेती आपण करतो. मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना खूप मोठी आर्थिक हानी होते. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदा, उद्योग  रोजगानिर्मिती याकडे शेतकरी वर्गाने लक्ष देणं आवश्यक झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक पद्धतीने मस्त्यपालन केले पाहिजे, असं राऊत म्हणाले.

प्रधानमंत्री मत्स संपदा योजना मत्स्य पालन या कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. आत्माराम कुंभार्डे, अजय शिरसागर, योगेश गांगुर्डे, वाल्मीक वानखेडे, दिगंबर वाघ, रावसाहेब गांगुर्डे, पुंडलिक गुंजाळ, संतोष जामदार, अमोल वानखेडे, संदीप पवार इत्यादी शेतकरी उपस्थित होते

टॅग्स :नाशिकशेतीशेती क्षेत्र