जळगाव : राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण 'मोबाइल हॅचरी' विकसित करण्यात प्रशासनाला यश आले आहे. येथील मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'मोबाइल हॅचरी' पोर्टेबल युनिटमुळे मत्स्यबीज उत्पादन आता अत्यंत स्वस्त आणि सोपे होणार आहे. दरम्यान, जळगावात विकसित झालेल्या देशातील पहिल्या 'मोबाइल हॅचरी'च्या प्रतिकृतीला पेटंटदेखील मिळाले आहे.
स्थानिक ठिकाणीच कमी खर्चात गुणवत्तापूर्वक मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन करण्यासाठी मत्स्यबीज उत्पादन मॉडेल बनवण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. त्यानुसार संशोधन सुरू केले. लक्षद्वीपमधील कनिष्ठ शास्त्रज्ञ सागर शिंदे, अहिल्यानगर येथील ऋषिकेश बोराडे, मू जे. महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नूतन राठोड यांच्या मदतीने वर्षभराच्या कालावधीनंतर स्मार्ट मॉड्युलर फिश हॅचरीचे मॉडेल प्रत्यक्षात साकारले.
काय आहे मोबाइल हॅचरी ?मत्स्य व्यवसायातील मोबाइल हॅचरी म्हणजे मासळीची अंडी उबवण्यासाठी आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी वापरली जाणारी एक फिरती किंवा पोर्टेबल (सहज हलवता येणारी) प्रणाली आहे.
असा होणार फायदाया हॅचरीच्या कमी किमतीमुळे मत्स्यबीज उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दिसून येईल. ही हॅचरी एका वाहनावर बसवली असल्यामुळे ती गरजेनुसार कुठेही घेऊन जाता येते.
देशात पहिल्यांदाच साकारण्यात आलेल्या 'मोबाइल हॅचरी'च्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता आणि इतर महत्त्वाचे घटक योग्य प्रमाणात राखले जाणार आहेत. त्यामुळे मत्स्यबीजांचे जगण्याचे प्रमाणात वाढ होईल आणि त्यांचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत मिळणार आहे.- अतुल पाटील, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, जळगाव,