Join us

Fish Farming : मत्स्य बोटुकलीचा दर केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही लागू होणार, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 21:12 IST

Fish Farming : मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटुकलीच्या दरात एकसंधता येणार आहे.

मुंबई :  प्रधानमंत्री मत्स्यव्यवसाय (Fish Farming) योजनेअंतर्गत ठरविण्यात आलेल्या मत्स्य बोटुकलीच्या दर महाराष्ट्रातही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

विधानभवनात आमदार प्रकाश सोळंके यांच्या विनंतीनुसार मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, केंद्र व राज्य शासनासाठी एकच दर लागू केला तर मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटुकलीच्या दरात एकसंधता येणार असून, स्थानिक मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना याचा लाभ होईल. तसेच ५०० हेक्टर क्षेत्रावर मत्स्यव्यवसायाचे धोरण हे प्रामुख्याने सखोल नियोजनावर आणि उत्पादन वाढीवर आधारित आहे.

आमदार सोळंके यांच्या मागणीनुसार ५०० हेक्टरवरील क्षेत्रासाठी वेगळे तर ५०० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी वेगळे धोरण ठरविण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. यावेळी मत्स्यव्यवसाय उत्पादन वाढीसाठी धोरण ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

मत्स्यबीज केंद्रामार्फत मत्स्यबीज खरेदी करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. राज्यातील मत्स्यबीज केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्यबीज खरेदी अनिवार्य करावी, या मुद्यावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच तलावांमध्ये मत्स्यबीज टाकण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी राखीव ठेवण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमच्छीमारकृषी योजना