Join us
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 07:44 IST

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाला तर निश्चितपणे मच्छ‍िमार बांधवांना शेतीसाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत मत्स्य विभाग अनुकूल आणि सकारात्मक भूमिका घेईल. मात्र, याबाबत इतर विभागांशी निगडित बाबींचा विचार करावा लागेल. त्यासंदर्भात निश्चितपणे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्यासंदर्भातील मागणी संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. आमदार प्रवीण दरेकर, आमदार महेश बालदी, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अतुल पाटणे, उप सचिव (मत्स्य) कि. म. जकाते, सहआयुक्त (मत्स्य-सागरी) महेश देवरे, रवींद्र वायडा, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य अभियंता आर.एम. गोसावी आदींची यावेळी उपस्थिती होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाला तर निश्चितपणे मच्छ‍िमार बांधवांना शेतीसाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. वीज, पाणी, कोल्ड स्टोरेज आदी सुविधाही त्यांना मिळू शकतील. मात्र, या व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यावर आणखी काय बाबी अंतर्भूत होऊ शकतात, इतर विभागांशी निगडित परवानगी त्यासाठी आवश्यक आहेत का, याचाही विचार केला जाईल. तसेच, राज्य मंत्रिमंडळासमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाईल, असे त्यांनी सांगितले.

रोजगाराशी निगडित ही बाब आहे. त्याचा अनुकूल आणि सकारात्मक परिणाम यावर होईल. त्यामुळे मच्छिमार बांधवांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. अतिशय गांभीर्याने यावर निर्णय होईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :मच्छीमारशेतकरीसुधीर मुनगंटीवारसरकारशेती