Pune : बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन (Biofloc Fish Farming) या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी २० व २१ मार्च रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी बायोफ्लॉक कल्चर योजनेतील सर्व बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर शेतकरी सहभागी होणार आहेत.
बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन हे आधुनिक तंत्रज्ञान असून हे किफायतशीर होण्यासाठी टँक उभारल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापूर्वी पूर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह शास्रोक्त पद्धतीने माशांच्या आरोग्य व्यवस्थापनाविषयी माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे.
या तंत्राबाबत शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ज्ञ अधिकारी व अनुभवी बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धक यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व परभणी या जिल्ह्यांतील बायोफ्लॉक प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा (पीएमएमएसवाय) अंतर्गत बायोफ्लॉक कल्चर योजनेतील सर्व बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारकांनी तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त श्री. शिखरे यांनी केले आहे.