Join us

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा; मच्छीमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने कर्ज मिळतंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:20 IST

मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा बहाल करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आणि तसा शासन निर्णयही जाहीर झाला.

हितेन नाईकपालघर : मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा बहाल करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आणि तसा शासन निर्णयही जाहीर झाला.

त्यानुसार मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने कर्ज मिळणे अपेक्षित होते, मात्र त्यांना ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेकडून घेण्यात आलेल्या उत्पादन कर्जावर पूर्वीप्रमाणेच ९ टक्के दराने व्याज आकारले जाणार आहे.

त्यामुळे मच्छीमार व्यवसायाला देण्यात आलेला कृषी दर्जा हा फक्त कागदावरच मिळाला आहे का? असा प्रश्न कर्जाऊ मच्छीमार बोट मालकांकडून उपस्थित केला जात आहे.

कृषी क्षेत्रासाठी असलेल्या अनेक सोयीसुविधा आणि सवलती देण्यासाठी राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याने राज्यातील मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला होता.

या घोषणेनंतर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाकडून ९ मे रोजी तसा शासन आदेशही काढला, मात्र त्यातील नमूद बाबींचा कुठलाही लाभ मच्छीमारांना मिळत नसल्याचे समोर आल्याने मच्छीमारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मच्छीमार कर्जात बुडणारशासन आदेशात मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे कृषीदरानुसार कर्ज साहाय्य देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र पालघर जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांप्रमाणे ४ नव्हे तर ९ टक्के व्याजदर आकारला जात आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला मच्छीमार आणखी कर्जात बुडण्याची भीती आहे.

पालघरमध्ये ४० संस्थापालघर जिल्ह्यात एकूण ४० मच्छीमार सहकारी संस्था असून, ठाणे जिल्ह्यात १६ मच्छीमार सहकारी संस्था आहेत. या सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपल्या सदस्य असलेल्या बोट मालकाला व्यवसाय करण्यासाठी ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी बँकेसह अन्य बँकेकडून कर्ज घेऊन वितरित केले जाते.

थकीत कर्जावर १० टक्के दरसर्वोदय मच्छीमार सहकारी संस्थेने जिल्हा बँकेकडून मागील दोन वर्षांत ५ कोटी ५ लाख ८९ हजार, तर २०२५-२६ मध्ये ३ कोटी ५० लाख ८६ हजाराचे कर्ज उचलले आहे. थकीत कर्जावर १०% तर नवीन कर्जावर २% व्याज दर लावला आहे.

मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याबाबत शासन स्तरावरून परिपत्रक मिळालेले नाही. - राजेंद्र पाटील, चेअरमन, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी बँक

महायुती सरकारने आमच्या व्यवसायाला कृषी सम दर्जा दिल्यानंतर त्या अनुषंगाने बँकेतून घेतलेल्या कर्जावर ९ ऐवजी ४ टक्क्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांना आदेशित करावे. - चंद्रकांत तरे, चेअरमन, सर्वोदय मच्छीमार सहकारी संस्था, सातपाटी

अधिक वाचा: सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रातच; कोणत्या बँकेचे किती कर्ज? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :मच्छीमारशेतकरीपालघरसरकारबँकठाणेपीक कर्जराज्य सरकार