Join us

जनावरांत रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:42 AM

राज्यातील, जिल्ह्यातील पशुधनाचे आरोग्य चांगले राखणे हे एक पशुसंवर्धन विभागाचे महत्त्वाचे ध्येय आहे. रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचारावर आज भर दिला जात आहे.

राज्यातील, जिल्ह्यातील पशुधनाचे आरोग्य चांगले राखणे हे एक पशुसंवर्धन विभागाचे महत्त्वाचे ध्येय आहे. रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचारावर आज भर दिला जात आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आपल्या जनावरांना लसीकरण करून घेणे.

पूर्वी जेव्हा लसीकरण केलं जायचे तेव्हा एक विशिष्ट पद्धत अवलंबली जात होती. दवाखान्या मार्फत ज्या गावात लसीकरण नियोजित असायचे त्या ग्रामपंचायतीला रीतसर पत्राने कळवून त्याबाबत दवंडी देण्यासही साठी विनंती केली जायची.

अनेक वेळा दवंडी देणाऱ्या व्यक्तीला पशुवैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष भेटून त्यांना खुष करायचे, जेणेकरून प्रत्येक गल्लीत दवंडी दिली जावी व जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण व्हावं इतकीच अपेक्षा असायची. त्यावेळी लस मोफत असायची.

मग अनेक मंडळी लसीकरणासाठी गावात ग्रामपंचायतीसमोर अथवा ठरवलेल्या मोकळ्या मैदानात जनावरे घेऊन यायची. चार दोन मोकळ्या बैलगाड्या पशुपालक आणून सोडायचे. त्याला बांधून लसीकरण केलं जायचं.

तरीदेखील ६०-६५ टक्क्यांच्या वर लसीकरण व्हायचे नाही. त्यामुळे कुठे ना कुठे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव व्हायचा. पुढे पुढे संकरित जनावरे वाढली, दूध उत्पादन वाढले, लोकांना वेळ मिळेनासा झाला.

दवंडी देणे हा प्रकार देखील बंद होत गेला. ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर निवेदन डेअरीवरील लाऊड स्पीकर वरून आवाहन करण्यास सुरुवात झाली. घरटी जनावरे वाढली. नवीन पिढीला जनावर ओढत आणावयाला कमीपणा वाटू लागला.

त्यामुळे लोक लसीकरणासाठी एकत्र येईनासे झाले. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी घटू लागली. मग शेवटी आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

घरोघरी जाऊन गोठ्यात येऊन लसीकरण करणे त्याची नोंद आपल्या सर्व जनावरांच्या कानातील नंबर समोर भारत पशुधन ॲपवर करणे, सोबत आपण घरी असता नसता अशा वेळी जनावर धरणे, लस टोचणे, कानातील नंबर पाहणे, त्याची नोंद घेऊन ती ॲपवर भरणे इत्यादी सर्व कामे उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या सहभागाने करावे लागते.

ते त्यांचे काम आहे आणि जबाबदारीही आहे. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त अपेक्षा इतकीच आहे की ज्यावेळी लसीकरणाबाबत आपल्याला निरोप येतो किंवा कळते अशावेळी आपण पशुपालक म्हणून स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे.

त्यावेळी हजर राहणे, प्रत्येक जनावराला लस टोचून घेणे, सोबत शेजारच्या सर्व जनावरांना देखील लस टोचली जाईल याबाबत दक्षता घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे आपले पशुधन साथीच्या रोगा पासून वाचेलच पण इतरांच्या पशुधनास देखील बाधा होणार नाही हे निश्चित.

सोबत अनेक वेळा अनेक साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वेळोअवेळी होऊ शकतो. अशावेळी देखील संबंधित रोगाची रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी देखील सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो यात शंका नाही.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: आहो ऐकलं का.. पशुधनाच्या कानात बिल्ला मारून घेतला?

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधराज्य सरकारसरकारग्राम पंचायत