Join us

...तर जनावरांची ना खरेदी-विक्री करता येणार, ना उपचार; आर्थिक मदतही बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:46 IST

पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली ३१ मार्च पर्यंतची मुदत, हे विसरलात तर १ जूननंतर करता येणार नाही जनावरांची खरेदी-विक्री

शासनाने जनावरांना ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केले आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद व ईअर टॅगिंग असल्याशिवाय जनावरांची खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नाहीत. या संदर्भात जिल्हाभरात ईअर टॅगिंग करण्याची मोहीम ३१ मार्चपर्यंत चालणार असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातून देण्यात आली.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन (एनडीआयएम) अंतर्गत सुरू केली आहे. यात भारत पशुधन प्रणालीत ईअर टॅगिंग (१२ अंकी कोड) केलेल्या पशुधनाच्या सर्व नोंदी घेण्यात येत आहेत.

३१ मार्चपर्यंत मुदत

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना ईअर टॅगिंग करून घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केले आहे. १ जूननंतर खरेदी-विक्री करता येणार नाही.भारत पशुधन प्रणालीवर नोंद व ईअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावराची खरेदी- विक्री करता येणार नाही.

वाहतुकीलाही बंदी

जनावरे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. आता टॅगिगशिवाय जनावरांची वाहतूकही करता येणार नाही. त्यामुळे चोरीचे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे.

ईअर टॅगिंग आवश्यक

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच अन्य पशूच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे जनावरांचे ईअर टॅगिग आवश्यक असणार आहे.

भारत पशुधन प्रणाली, १२ अंकी कोडवर नोंदी

भारत पशुधन प्रणालीत जनावरांच्या जन्म-मृत्यूची नोंदणी, औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व, उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ईअर टॅगिंग आवश्यक आहे

टॅग्स :दुग्धव्यवसायव्यवसाय