Join us

Sheli Palan : शेळीपालन करण्याच्या विचारात आहात? मग हे अवश्य वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:29 IST

Goat Farming : शेळीपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय असून विशेषत: महाराष्ट्रात शेतीबरोबर शेळीपालनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने शेळीपालनांस चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना देखील राबवल्या जातात.

शेळीपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय असून विशेषत: महाराष्ट्रात शेतीबरोबरशेळीपालनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने शेळीपालनांस चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना देखील राबवल्या जातात.

शेळीपालन शेतीपूरक आर्थिक उन्नतीचा मार्ग देणारा व्यवसाय आहे. मात्र यात आधुनिक व सुधारित तंत्रज्ञान वापरणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेळीपालन व्यवसाय फारसा यशस्वी ठरत नाही.

आपला देश हा कृषिप्रधान असून शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी व मेढीपालनास विशेष महत्त्व आहे. मर्यादित स्वरूपातील या व्यवसायाकडे अलीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील पाहिले जाऊ लागले आहे.

कमी खर्च व कमी कष्ट यातून जास्त उत्पन्न मिळत असल्याने या व्यवसायाकडे अल्पभूधारक, भूमिहीन शेतकरी व महिलांचा कल अधिक वाढला आहे. 

शेळीपालन व्यवसायाचे चोख नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानास मेहनत व चिकाटीची जोड दिल्यास शेळीपालनातून किफायतशीर उत्पादन मिळून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. राज्यात मांसाची मागणी व उत्पादकता यात मोठी तफावत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे अधिक दर्जेदारपणे शेळ्यांचे संगोपन करून जास्तीत जास्त उत्पादन स्तर या व्यवसायातून वाढवणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.

✦ शेळीपालन व्यवसाय का करावा? 

• शेळीपालन व्यवसाय कमी गुंतवणूकीत कोणत्याही व्यक्तीस अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो.• शेळीपालन व्यवसाय शेतीपूरक महत्त्वाचा व्यवसाय आहे.• शेळीपालनातून दुधाचे उत्पादन होते.• शेळीपालतून उत्तम दर्जाचे मांस उत्पादन मिळते.• बहुतांशी लोकांच्या आहारात बकरीच्या मांसाचा उपयोग केला जातो.• शेळीपालनातून चांगल्या प्रकारचे लेंडीखत शेतीचा कस सुधारण्यासाठी उपयोग होतो.• मांस विकल्यानंतर उर्वरित कातडीला सुद्धा चांगला दर मिळतो.• बकरीच्या कातडीपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात.• विविध शासकीय योजनांचा लाभ शेळीपालनासाठी घेता येतो.

✦ शेळीपालन व्यवसायात संधी व वाव 

• शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळ्यांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाई, म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्पभूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.

• भारतात असणाऱ्या शेळ्यांची संख्या सुमारे १२३ दशलक्ष इतकी आहे. तर जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या आहेत. असे असले तरी भारतात शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे. दूध, मांस व कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यांपासून फक्त ३ टक्के दूध, ४५ ते ५० टक्के मांस व ४५ टक्के कातडी प्राप्त होते. भारतात शेळ्यांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त ५८ लिटर इतके आहे. 

• खाद्याचे, शेळ्यांच्या आरोग्याचे, निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो.

• बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळ्यांना गोठ्या मध्येच पुरवला जातो.

• अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोकळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळ्यांना चाऱ्याबरोबर शेतातील व बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात, यामुळे शेळ्यांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.

✦ शेळीपालन व्यवसायातून होणारे फायदे

• शेळीपालन व्यवसाय अल्प गुंतवणुकीनेही केला जाऊ शकतो.• शेळ्यामध्ये दोन पिलांना जन्म देण्याची क्षमता अधिक असल्याने अधिक उत्पन्नासाठी फायदेशीर आहे.• काही जातीच्या शेळ्या या १४ महिन्या मध्ये दोनदा वितात यामुळे अधिक उत्पन्न मिळते.• पैशाची गरज भासल्यास शेळ्या विकून तो उभा करता येऊ शकतो.• शेळी हा प्राणी काटक असतो, त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवून घ्यायची असते.• शेळ्यांच्या विष्ठेचे उत्तम खत म्हणून उपयोग होतो.• बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त असून ती दिवसेंदिवस वाढत आहे.• शेळ्यांचे शिंगापासून व खुरापासून वस्तू बनतात.• शेळीचे वेत लवकर येतात म्हणून त्यांचे उत्पादन लवकर वाढते.

प्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभागदादासाहेब पाटील कृषि महाविद्यालयदहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.

हेही वाचा : Crop Management : यंदा टरबूज, खरबूज लागवड करायची आहे ? मग 'हे' तंत्र वापरा आणि उत्पादन वाढवा

टॅग्स :शेळीपालनशेतीशेतकरीशेती क्षेत्रबाजारव्यवसाय