Join us

पोळा विशेष :सर्जा राजाच्या आठवणीने आता डोळे होतात ओले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 16:03 IST

पोळा हा बैलांची पूजा करण्याचा महत्त्वाचा सण. आज अनेक शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे बैलं विकावी लागत आहेत. एका शेतकरीपुत्राने मांडलेली ही पोळ्याची व्यथा...

आमच्या शेतात वर्षानुवर्षे राब-राबणाऱ्या लाडक्या राजाचे हे चित्र मागील वर्षाचे आहे.. आमच्या घरातील बैलांचे हे शेवटचे चित्र. बाबांना स्वतः शेतात काम करणं व बैल जोडीची काळजी घेणं हे तब्बेतीच्या कारणाने शक्य होत नाही म्हणून मागच्या वर्षीच जोडी बाजारात विकली.

आज सकाळी उठलो. अनुला, मुलीला शाळेत सोडून आलो. लोकमत वाचताना एका पानावर  छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी काढलेला बैलाला आंघोळ घालतानाचा फोटो बघितला. लगेच बायकोला म्हटलं आज बैल पोळा आहे, बाबांना फोन लाव! हे बोलतानाच डोळ्यात अश्रू तरळले.. बाबांना फोन लावण्यामागाचे एकच कारण आम्ही प्रत्येक वर्षी पोळ्याला गावी जात होतो. ज्यावर्षी जाणे शक्य झाले नाही तेव्हा बाबांना सकाळी कॉल करून विचारणा करायची. बैलांना आंघोळ घातली का? शिंगे घासली का? शेपटीचा गोंडा कटिंग करायला माणूस येऊन गेला का अशी सर्व विचारणा व्हायची.

बाबा बैलांची ही सेवा पोळ्याच्या दिवशी अगदी मनापासून वर्षानुवर्षे अविरतपणे करत आले. आदल्या दिवशी रात्री आई बाबा बैलांना पोळ्याच्या दिवसाचे  आमंत्रण द्यायचे. पोळ्याच्या दिवशी सर्वांनी लवकर उठायचं कोणी बैलांचे चाऱ्यापाण्याचे काम तर कोणी दुकानात जाऊन नारळ अगरबत्ती घेऊन यायचे.आईची तर भल्या पहाटे उठून स्वयंपाकाची लगबग चालू असायची. पुरण पाट्यावर वाटणे, उडद डाळ वाटणे, भाजी बनवणे तसेच बैलांच्या शिंगात घालायच्या पिठाच्या रिंग अशा सर्व कामात आई खूप व्यग्र असायची. कारण १२च्या आत स्वयंपाक (नैवेद्य) तयार पाहिजे. 

लहान असताना मी बाबांसोबत सकाळी सकाळी तलावावर बैलांना धुण्यासाठी जात होतो.आंघोळ घालून घरी आल्यावर शिंगांची रंगरंगोटी शिंगाना फुगे लावणे माझ्याकडेच असायचं. झूल चढवणे तसेच बैलांना संपूर्ण साज चढवणे हे बाबा करायचे. आमचे शिंगे रंगवणे झाले की मला गावातून वेगवेगळ्या घरच्या बैलांना शिंगे रंगवायचे काम असायचे. मी ही हे अगदी मानापासून करीत होतो. संपूर्ण गाव बैलांच्या घुंगरांच्या आवाजाने संगीतमय व्हायचं. दु.१२च्या आत बैलांना दारासमोर खाट मांडून त्यावर सर्व शेती अवजारे समोर ठेवली जायची. बैलांना समोर आणून त्यांना नैवेद्याचे जेवण दिले जायचे. जेवण झाल्यावर बैलांना पळवत मारुतीच्या मंदिरात नेऊन फेरी मारायची आणि तेथून गावा बाहेर असलेल्या मरीमाता मंदिरात नारळ फोडून घरी यायचे.गावात बाजार पट्टा आहे तिथे तोरण बांधले जायचे. 

इथे गावातील सर्व बैल जमा व्हायचे. तोरणाच्या मध्यभागी नारळ बांधलेले असायचे. तोरणाचा दोर दोन्ही बाजुने दोन व्यक्तींनी उंच ठिकाणी जाऊन पकडलेला असायचा. हा दोर सतत खाली वर असा हलता ठेवावा लागत असे. एक-एकाने बैल पळवत आणायचा व पळत पळतच बैलासोबत दोर हातात धरून उडी मारून हे नारळ पकडायचे. जो हे नारळ पकडेल त्या बैलाला व मालकाला गावात विशेष सन्मान मिळत असे. असा हा माझ्या आठवणीतील गावाचा पोळा.आता आम्ही तीनही भाऊ नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरात शिफ्ट झालो. आईबाबा गावाला असतात पण त्यांची आमच्याकडे ये-जा चालू असते.  आज सकाळी प्रकर्षाने आठवण आली आमच्या सर्जा राजाची. धन्यवाद सर्जा! तू शेतीत दिलेल्या योगदानाबद्दल!

- प्रकाश सपकाळे, व्यवस्थापक, आयसीडी, नाशिक(लेखक शेतकरी पुत्र असून दैनिक लोकमतमध्ये वरिष्ठ आर्टिस्ट आहेत.)

टॅग्स :दुग्धव्यवसायभुसावळशेतीशेतकरी