Join us

Mahamesh Scheme : महामेष योजनेसाठी शासनाकडून अनुदान योजनेला मान्यता, अर्ज भरण्यास सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:27 IST

या अनुदान योजनेमुळे स्थलांतर करणाऱ्या पशुपालकांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतील आणि त्यांची आर्थिक प्रगती होणार आहे. 

राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील पशुपालकांना बळ देणाऱ्या यशवंतराव होळकर महामेष योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्र्यांनी दिली. यामुळे पारंपारिक पद्धतीने मेंढी/शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबाला याचा फायदा होणार आहे. या अनुदान योजनेमुळे स्थलांतर करणाऱ्या पशुपालकांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतील आणि त्यांची आर्थिक प्रगती होणार आहे. 

अधिक माहितीनुसार, या अनुदान योजनेतून मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यशवंतराव होळकर महामेष योजनेमुळे धनगर व तत्सम जमातीला फायदा होत आहे.(Mahamesh Scheme Application)

काय आहे योजनेचे स्वरूप?यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढया + १ मेंढा नर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान दिले जाईल, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान इ. घटकांचा समावेश केला आहे. मेंढ्यासाठी चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन आहे, अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर  या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६,०००/- असे एकूण २४,०००/-  चराई अनुदान वाटप केले जाईल. 

मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता ‍ जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या ७५% अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाडयापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या ७५% रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणुन कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान दिले जाईल. कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपना साठी कमाल रु. ९०००/-  मर्यादेत ७५% अनुदान याबाबींचा समावेश आहे. 

सदर योजनेचे अर्ज www.mahamesh.org या  संकेतस्थळावर उपलब्ध असून, या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेळीपालन