Join us
Daily Top 2Weekly Top 5

टोकदार शिंगे, रेशमी केस… 'सुलतान'ची एंट्री ठरणार चर्चेचा विषय! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:37 IST

वजन ३० किलो, अंगावर पांढरे रेशमी केस आणि रुबाबदार चाल… असा 'सुलतान' आष्टीत दाखल होताच प्रदर्शनात चर्चेला उधाण आले आहे. हा चायनीज बोकड पाहण्यासाठी शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नितीन कांबळे

आष्टी येथे आजपासून सुरू होत असलेल्या राज्यस्तरीय डॉ. स्वामीनाथन कृषी प्रदर्शनात यंदा एक अनोखा पाहुणा सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.

सांगली जिल्ह्यातील नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील रूपेश कोळेकर यांच्या मालकीचा 'सुलतान' नावाचा चायनीज जातीचा बोकड प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

'सुलतान'ची वैशिष्ट्ये काय?

वय सुमारे ३ ते ४ वर्षे, उंची जवळपास २ फूट आणि वजन २५ ते ३० किलो असलेला हा बुटका चीन-पिंग (चायना झिंग) जातीचा बोकड आहे.

त्याच्या अंगावर पूर्णपणे पांढरे, लांब आणि रेशमी केस आहेत. १.२५ फूट लांबीची वळणदार, टोकदार शिंगे आणि रुबाबदार चाल यामुळे 'सुलतान' नावाला साजेसा थाट त्याच्यात दिसून येतो.

सुलतान आपल्या शांत स्वभाव, आकर्षक ठेवण आणि देखण्या रूपामुळे कोल्हापूर, सोलापूरसह विविध भागांतील प्रदर्शनांमध्ये आधीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

लाखो रुपयांची किंमत मिळवू शकणारा उच्च दर्जाचा बोकड म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.

चीनमधून खरेदी

रूपेश कोळेकर यांनी हौसेपोटी चीनमधून या विशेष प्रजातीचा बोकड खरेदी केला. त्यानंतर त्याचे संगोपन आणि देखभाल अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली.

योग्य आहार, आरोग्य व्यवस्थापन आणि देखभालीमुळे 'सुलतान'ची ठेवण अधिक उठून दिसते.

कृषी प्रदर्शनाचे तिसरा वर्ष

आष्टी येथे सलग तिसऱ्यांदा आयोजित करण्यात येणारे हे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.

प्रदर्शनात जवळपास १५० शेतीविषयक स्टॉल्स, २०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवीन बियाणे, खते आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

आयोजक माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, 'यंदाच्या प्रदर्शनात चायनाचा ‘सुलतान’ हा चिनी जातीचा बोकड प्रमुख आकर्षण ठरणार असून मोठ्या संख्येने शेतकरी आणि पशुपालक उपस्थित राहतील.'

शेतकरी व पशुपालकांसाठी संधी

या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती, पशुपालनातील नव्या संधी आणि उच्च प्रतीच्या जातींची ओळख होणार आहे.

'सुलतान'सारख्या विदेशी जातीच्या बोकडामुळे पशुपालन क्षेत्रात नवीन पर्यायांचा विचार करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.

आष्टीतील या कृषी मेळाव्याकडे राज्यभरातील शेतकरी, पशुपालक आणि कृषी उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

‘सुलतान’चा थाट आणि कृषी प्रदर्शनाची व्याप्ती यामुळे यंदाचा मेळावा अधिक रंगतदार ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : ७५ लाखांची बुटकी म्हैस; ५० लाखांचा ‘सोन्या’ बैल : परळीत पशुधनाचा जल्लोष!

English
हिंदी सारांश
Web Title : Sultan the goat: Showstopper at Ashti agricultural exhibition.

Web Summary : Sultan, a rare Chinese goat, is the main attraction at Ashti's agricultural exhibition. Owned by Rupesh Kolekar, this unique goat boasts silky white hair, impressive horns, and a calm demeanor, drawing crowds and showcasing new livestock opportunities.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीप्राणी