Join us

Pdkv Cow : अकोल्यात सेक्स-सॉर्टेड सिमेनचा यशस्वी प्रयोग; पाहा काय आहे विशेष वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:41 IST

Pdkv Cow : अकोला कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागाने देशी गोवंश (Pdkv Cow) संवर्धनासाठी अत्याधुनिक 'फिमेल सेक्स सॉर्टेड सिमेन' (Sex-Sorted Semen) तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. जाणून घ्या सविस्तर

Pdkv Cow : अकोला कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागाने देशी गोवंश (Pdkv Cow) संवर्धनासाठी अत्याधुनिक 'फिमेल सेक्स सॉर्टेड सिमेन' (Sex-Sorted Semen) तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला असून, साहिवाल जातीच्या शुद्ध कालवडींचा जन्म घडवून आणण्यात यश मिळविले आहे.

यामुळे देशी दुग्ध व्यवसाय अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या काही दशकांत शेती क्षेत्रात हवामान बदलाचे मोठे परिणाम झाल्याने पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाचे महत्त्व वाढले आहे. (Pdkv Cow)

मात्र, पारंपरिक गोपालन पद्धतीत देशी गायींची उत्पादकता कमी असल्याने आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्याचे प्रमाण मर्यादित राहिले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.  (Pdkv Cow)

देशी गोवंश संवर्धन व वृद्धीकरण या उपक्रमा अंतर्गत विद्यापीठात 'फिमेल सेक्स सॉर्टेड सीमेन' (Sex-Sorted Semen)  या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शुद्ध जातीच्या साहिवाल कालवडी जन्माला घालण्यात यश मिळाले आहे. 

साहिवाल ही देशी गोवंशातील सर्वोत्तम दुग्ध उत्पादन करणारी जात मानली जाते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी व गोपालकांना उत्पादनक्षम वंश प्राप्त करून दुग्ध व्यवसायात अधिक कमाईचा मार्ग मोकळा होणार आहे.

या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कालवड जन्माची शक्यता सुमारे ९० टक्क्यांपर्यंत वाढवता येते. परिणामी बैल जन्मण्याचे प्रमाण घटून, फक्त दुग्धजन्य उत्पादनक्षम कालवडींची संख्या वाढते. यामुळे, शेती यांत्रिकीकरणामुळे उपयोगात नसलेल्या बैलवर्गीय जनावरांची संख्या नियंत्रणात ठेवता येते.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. शेषराव चव्हाण यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवला जात असून, डॉ. राजेश्वर शेळके, डॉ. प्रकाश कहाते, डॉ. संजय शेगोकार, डॉ. संजीवकुमार नागे, डॉ. किशोर बिडवे, डॉ. राजेश ढगे, रवि पवार, पंकज कोकाटे, डॉ. संतोष चोंडके आदी तज्ज्ञ या प्रकल्पात योगदान देत आहेत.

या तंत्रज्ञानामुळे केवळ जातीवंत गोवंश उपलब्ध होणार नाही तर गोपालकांना अधिक दुधाळ जनावरांची मिळकत, आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत जास्त नफा मिळणार आहे. त्यामुळे वऱ्हाडातील पशुपालक व शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प एक आशेचा किरण ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर :Sericulture Farming : 'सिल्क अन् मिल्क' संकल्पना शेतकऱ्यांसाठी ठरणार गेमचेंजर! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रअकोलागायकृषी विज्ञान केंद्र