Join us

Pashudhan Bajar : पशुधन बाजारात शांतता का? काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:23 IST

Pashudhan Bajar :दिवाळीच्या सुट्ट्यांनंतरही पशुधनाच्या बाजारात व्यवहार मंदावले आहेत. दुधाळ म्हशी व गाईंच्या खरेदी-विक्रीत घट झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. काय आहे कारण वाचा सविस्तर (Pashudhan Bajar)

रामकिशन भंडारे

दसऱ्यापासून लातूर आणि परिसरातील पशुधनाच्या बाजारात उलाढाल मंदावली आहे. ऐन दिवाळीच्या काळातही बाजारपेठेत अपेक्षित उत्साह दिसत नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  (Pashudhan Bajar)

शनिवारच्या बाजारात केवळ दीडशे जनावरे विक्रीसाठी आली होती, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. (Pashudhan Bajar)

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतरही पशुधनाच्या बाजारात व्यवहार मंदावले आहेत. दुधाळ म्हशी व गाईंच्या खरेदी-विक्रीत घट झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे.  (Pashudhan Bajar)

अतिवृष्टी, चाऱ्याची टंचाई आणि शेतीतील काढणी-पेरणीच्या कामामुळे शेतकरी बाजारात येत नाहीत. व्यापारी व पशुपालक दोघेही चिंतेत असून, जानेवारीपासून दुभत्या जनावरांच्या मागणीत पुन्हा वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पावसाळ्याचा फटका पशुपालकांना

यंदाचा पावसाळा पशुपालकांसाठी आव्हानात्मक ठरला. मान्सूनपूर्व पावसाने आणि नंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली. 

पाण्यात वैरण गेल्याने दुधाचे उत्पादन घटले. अनेक पशुपालकांना जनावरांचे पालन कठीण झाले होते. सध्या वातावरण कोरडे असून परिस्थिती हळूहळू सावरत असली तरी आर्थिक फटका अजून भरून निघालेला नाही.

शेतीची कामे आणि सणामुळे बाजारात ओस पडली

सध्या सोयाबीन काढणी, मळणी, रब्बी पेरणी आणि सण-सुट्ट्यांचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक दोघांनाही बाजारात येण्यासाठी वेळ मिळत नाही. खरीप हंगामातील नुकसानामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळली असून, त्याचा परिणाम पशुधन बाजारावरही झाला आहे.

दर घसरले, पण मागणी वाढण्याची शक्यता

सध्या बाजारात दुधाळ म्हशींचे दर ४० हजारांपासून १ लाख रुपयांपर्यंत आहेत. तथापि, दिवाळीनंतर दुधाळ जनावरांच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या ६० हजार रुपयांत मिळणारी चांगली दूध देणारी म्हैस सव्वा महिन्यानंतर ७० ते ७५ हजारांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

शनिवारी बाजारात १५० जनावरे दाखल झाली, त्यापैकी ६६ जनावरांसाठी दाखले काढण्यात आले, आणि ४४ पशुपालकांना इअर टॅगिंग दाखले देण्यात आले, अशी माहिती बाजार समितीकडून मिळाली.

पुढील काळात काय?

जानेवारीपासून दुभत्या जनावरांची मागणी वाढेल. उन्हाळ्यापूर्वी दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी नवीन जनावरे खरेदी करतील, त्यामुळे फेब्रुवारी-मार्चपर्यंत बाजार पुन्हा तेजीत येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

आता दुधाळ जनावरांचे दर कमी आहेत, पण सव्वा महिन्यानंतर किंमती वाढतील. अतिवृष्टीमुळे पशुपालकांनी बाजारात येणे टाळले आहे.- बब्रुवान सुरवसे, पशुपालक

दसरा-दिवाळीत शेतीची कापणी, पेरणी सुरू असल्याने बाजारात कमी उलाढाल असते. आठवड्याभरात बाजार पुन्हा सुरू होईल.- राजपाल सांडूर, बाजार प्रमुख, मार्केट यार्ड

लम्पी रोगामुळे गाई-बैलांच्या खरेदीत घट झाली आहे. किंमती कमी झाल्याने शेतकरी बाजारात येत नाहीत.- रफी शेख, व्यापारी

हे ही वाचा सविस्तर : Heavy Rain in Vidarbha : धानपीक झाले आडवे; अवकाळीने सोयाबीनलाही झोडपलं!

English
हिंदी सारांश
Web Title : Livestock market dull; buying and selling slow down.

Web Summary : Latur's livestock market sees sluggish trade post-Dussehra, impacting farmers. Unseasonal rains and crop damage hurt rural economy. Reduced cattle arrivals and subdued demand due to harvest season and festival. Traders anticipate market recovery soon.
टॅग्स :शेती क्षेत्रप्राणीबाजारशेतकरीशेती