नाशिक : चारा व पाण्याची टंचाई, व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कळीत झाले. शेतीचे उत्पन्न नाही, दारासमोर बांधलेल्या पशुधनास जगवण्यासाठी चारादेखील विकत घेण्याची वेळ बळीराजावर ओढवली. त्यात असा उन्हाळा यामुळे दूध उत्पादन घटले आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती, चारा व पाण्याची टंचाई यामुळे आश्वासक असणारा दुग्ध व्यवसाय दुधाच्या घसरत्या दरामुळे परवडेनासा झाला आहे.
दूध उत्पादनात सुमारे दहा टक्के घट...सिन्नर तालुक्याचे प्रतिदिन दूध संकलन सुमारे सहा लाख लिटर इतके आहे. त्यात सुमारे ६० हजार लिटर प्रतिदिन घट झाली आहे. दुधाच्या घसरलेल्या दरामुळे आणखी आर्थिक फटका बसतो आहे. ऑगस्टपर्यंत ही परिस्थिती कायम राहील. पावसाने अनुकूल साथ दिली तरच ऑगस्टनंतर टंचाई संपेल.
दुधाचा जोडधंदा ठरतोय आतबट्ट्याचा...सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक शेतकऱ्यांना चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. हिरवा चारा मिळत नाही. पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. सरकी पेंड २१००, तर कांडी २००० प्रति ५० किलो बॅग या दराने खरेदी करावी लागते. शेतकऱ्यांना दूध संकलन केंद्रात गायीच्या दुधाला ३६ रुपये ते ४० रुपयांपर्यंतचा दर मिळतो. त्यामुळे दुग्ध व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे.
मिळणारे अनुदान वर्षभरापासून बंद..वर्षभरापूर्वी शासनाकडून दुधाला पाच रुपये प्रतिलिटर अनुदान मिळत होते. मात्र गेल्या वर्षभरापासून सदर अनुदान बंद असल्याने ते पूर्ववत सुरू करण्याची मागणी सिन्नर बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे यांनी केली आहे.
दूध उत्पादक दुहेरी संकटात...शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र एकीकडे चाराटंचाई तर दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून दुधाच्या खरेदी दरात कोणतीही वाढ झाली नाही. राज्यातील दूध उत्पादक सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत.
उन्हाळा असह्य झाला आहे. पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हिरवा चारा बाहेर तालुक्यातून विकत घ्यावा लागत आहे. दूध उत्पादन घटण्यासह दुधाला योग्य भाव मिळत नाही. शासनाने दुग्ध व्यवसायासाठी अनुदान देण्याची गरज आहे.- नारायण गोसणे, दुग्ध उत्पादक शेतकरी, दुशिंगपूर, ता. सिन्नर
Web Summary : Sinner farmers face losses as milk subsidies halt, feed costs surge, and production drops due to drought. Dairy farming becomes unsustainable, demanding government intervention to revive the sector and support struggling producers.
Web Summary : सिन्नर के किसान दूध सब्सिडी बंद होने, चारे की लागत बढ़ने और सूखे के कारण उत्पादन में गिरावट से नुकसान का सामना कर रहे हैं। डेयरी फार्मिंग अस्थिर हो रही है, क्षेत्र को पुनर्जीवित करने और संघर्षरत उत्पादकों का समर्थन करने के लिए सरकारी हस्तक्षेप की मांग की जा रही है।