Join us

दुधात घट, मृत्यू होण्याचा धोका टळला, लाळ्या खुरकुतची 72 हजार जनावरांना लस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 6:39 PM

लसीकरणामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट व मृत्यू होण्याचा धोका टळल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

मालेगाव : कोरोना महामारीनंतर जनावरांना लाळ्या खुरकुत रोगाचा प्रादुर्भाव होऊन जनावरांचा मृत्यू झाला. जनावरांना आलेल्या महामारीला रोखण्यासाठी वर्षातून दोनवेळा लाळ्या खुरकुत प्रतिबंधक लस दिली आते. त्यानुसार पशुवैद्यकीय कार्यालयाने मार्चअखेर ७२ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या लसीकरणामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट व मृत्यू होण्याचा धोका टळल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

दुष्काळी संकटात लाळ्या खुरकुत आजारापासून जनावरांचे संरक्षण व्हावे, यासाठी तालुक्यातील गायी व म्हशींना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी १ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार मार्चअखेरपर्यंत तालुक्यातील १ लाख ५४ हजार ४४६ गायी, म्हशी व १ लाख ७३ हजार ५०७ शेळ्यांना लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध झाली होती.

असे होते आजाराचे लक्षणे

ताप येतो. खाणे-पिणे कमी किंवा बंद होते. तोंडात, जिभेवर, हिरड्यांवरील श्लेष्मल व खुरातील बेचक्यात फोड येतात. ते फुटून त्याचे व्रण बनतात.तोंडातून लाळ गळते व नाकातून स्राव वाहतो. जनावरे लंगडतात व कधी कधी तर संपूर्ण खूर बाहेर येतात. गाय-म्हशींच्या कासेवर कधी कधी फोड व व्रण होऊन स्तनदाह होतो. संसर्गामुळे कळपातील इतर गुरांना आजाराची लागण होते.

लाळ्या लाळ खुरकुत रोगाचा प्रादुर्भाव होऊन जनावरांचा मृत्यू होऊ नये, यासाठी मालेगाव तालुक्यतील जनावरांना लसीकरण करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार तीन महिन्यांत ७२ हजार प्रतिबंधक लस जनावरांना देण्यात आली आहे. त्यामुळे सध्यातरी जणावरांचा धोका टळला आहे. -  डॉ. जावेद खाटिक, पशुधन विकास अधिकारी, मालेगाव

५० टक्के दुधाचा धोका टळला

लाळ्या खुरकुत रोग हा आर्थिक नुकसान करणारा रोग असल्याने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. रोगाची साथ उ‌द्भवल्यास उपचारावर खर्च होऊन दूध उत्पादनात ५० टक्के घट येते व शेतीच्या कामी असलेल्या बैलाच्या आजारामुळे शेतीची कामे खोळंबली जातात.

वर्षातून दोनवेळा दिली जाते लस

लाळ्या खुरकुत या विषाणूजन्य आजाराच्या ७७ हजार प्रतिबंधात्मक लस तालुक्यासाठी शासनाकडून प्राप्त झाल्या. ही लस जिल्ह्यातील म्हैस व गायवर्गीय सर्वच जनावरांना २१ दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील सर्व शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयातून देण्यात येत आहे. लसीकरण झाल्यानंतर जनावरांना सावलीत बांधून भरपूर पाणी पाजावे, बैलांना एक दिवस विश्रांती द्यावी, असे आवाहन पशुपालकांना केले जात आहे. तर सदर लस वर्षातून दोनवेळा दिली जात असल्याचे पशुवैद्यकीय विभागाचे डॉ. जावेद खाटिक यांनी सांगितले.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीदुग्धव्यवसायनाशिकमालेगांवशेती क्षेत्र