गोंदिया : दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र शेतकऱ्यांची विदारक स्थिती आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे. २०११-१२ पासून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील (Gondiya District) ३०६ गावांना कामधेनू ग्राम म्हणून दत्तक योजनेंतर्गत दत्तक घेऊन दुग्ध उत्पादनात २० टक्के वाढ झाली आहे.
राज्यातील गायी व म्हशींच्या दूध उत्पादनामध्ये (Milk Production) लक्षणीय वाढ व्हावी, यासाठी कामधेनू दत्तक ग्राम ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येते. गावातील दूध उत्पादनात वाढ करण्यात यावी. पशुपालनाला तांत्रिक जोड देऊन लसीकरणापासून जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून (Agriculture Department) कामधेनू दत्तक गावात करण्यात येते. या योजनेमुळे त्या त्या गावात पूर्वीच्या तुलनेत दूध उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०११-१२ पासून ही योजना राबविण्यात येत आहे.
गावाला वर्षाकाठी १ लाख ५२ हजार ज्या गावाला कामधेनू योजनेत दत्तक घेतले, त्या गावाला वर्षासाठी १ लाख ५२ हजार रुपये जनावरांच्या संवर्धनासाठी दिले जाते. गावातील सर्वाधिक पशुमालकाची पशुमालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. कामधेनू गावातील शेतकरी व पशुमालकांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी एक दिवस मुक्काम करतात.
योजनेसाठी या गावांनी साधला विकास जिल्हा पशुसंवर्धन विभागाने कामधेनू दत्तक ग्राम म्हणून घेतलेल्या टेमणी, शिरपूर, कोरणी, डांगोली, अदासी, नवेगाव, कवळी, करंजी, मक्कीटोला, अंजोरा, हलबीटोला, पिपरिया, पोवारीटोला, बंजारी, मुरदोली, इस्तारी, चोरखमारा, ठाणेगाव, मेहंदीपूर, मनोरा, पूरगाव, तेलनखेडी, कुन्हाडी, तेढा, कोसबी-कोल्हारगाव, तिडका, पांढरी- हलबीटोला, नवेगावबांध, महागाव व बोंडगावदेवी या गावांनी दुग्ध उत्पादन वाढविले आहे.
दत्तक घेतलेल्या गावात या गोष्टींकडे लक्ष गावाला दत्तक घेतले, त्या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण, दुग्ध उत्पादन किती आहे, दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल, जनावरांची औषधी, खनिजद्रव्ये, जंतनाशक औषधी, गोचीड, शेतकऱ्यांची सहल नेणे, नावीन्यपूर्ण उपक्रम, संकरित वासरांचा मेळावा घेऊन त्यांना बक्षीस देणे, वैरण विकासासाठी प्रयत्न करणे, जनावरांच्या विस्तारासाठी कार्यक्रम घेणे, गोठा स्वच्छ करणे, चाऱ्याचे व खताचेही व्यवस्थापन केले जाते.