Hydroponic Fodder : पावसाळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी भेडसावणाऱ्या हिरव्या चाऱ्याच्या टंचाईवर काही पशुपालकांनी यंदा चतुराईने मात केली आहे. हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांनी कमी जागेत आणि कमी खर्चात पौष्टिक हिरवा चारा तयार करण्याचा पर्याय निवडला.(Hydroponic Fodder)
मक्याचे दाणे भिजवून मोड आणून तयार केलेला हा चारा शेळ्या व दुभत्या जनावरांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी सांगितला आहे.(Hydroponic Fodder)
हिरव्या चाऱ्याची टंचाई आणि शोधला मार्ग
यंदा जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव तालुक्यातील हिरव्या चाऱ्याची परिस्थिती बिकट झाली होती.
जुलैच्या मध्यापर्यंत काही प्रमाणात पाऊस झाला, तरीही अनेक ठिकाणी चाऱ्याचा पुरवठा अजूनही अपुरा आहे. यामुळे पशुपालकांची मोठी अडचण झाली होती.
याच अडचणीवर उपाय म्हणून काही पशुपालकांनी 'हायड्रोफोनिक' पद्धतीने घरच्या घरी हिरवा चारा तयार करण्याचा प्रयोग सुरू केला.
कमी जागेत, कमी पाण्यावर आणि अल्प खर्चात तयार होणारा हा पौष्टिक चारा जनावरांच्या तब्येतीसाठी खूप उपयुक्त ठरतो आहे.
हायड्रोफोनिक चारा तयार करण्याची पध्दत
* मक्याचे दाणे २४ तास भिजवून ठेवावेत.
* त्यानंतर ओलसर गोणपाटात पसरवून मोड येऊ द्यावे.
* मोड आलेले दाणे मातीने भरलेल्या ट्रेमध्ये (मातीच्या टोपल्या किंवा प्लास्टिक ट्रे) पेरावेत.
* एका ट्रेमध्ये साधारण ४०० ग्रॅम मका पेरला जाऊ शकतो.
* दररोज दर दोन तासांनी पाणी द्यावे.
* आठ दिवसांत हिरवट चारा तयार होतो, आणि १२ दिवसांत तो तोडायला तयार होतो.
* एका ट्रेमध्ये सुमारे ६ किलो चारा मिळतो.
जनावरांसाठी फायदेशीर
हा चारा १०० टक्के सेंद्रिय असून त्यामध्ये प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्त्वे व सूक्ष्म अन्नघटक मुबलक प्रमाणात असतात.
भरड धान्याच्या तुलनेत हा चारा अधिक चविष्ट, पौष्टिक आणि पचायला हलका आहे. जनावरे आवडीने खातात, तब्येत सुधारते आणि दुधाळ जनावरांचे उत्पादनही वाढते.
हायड्रोफोनिक चाऱ्याचे फायदे
* कमी पाण्यात व कमी जागेत तयार होतो.
* रासायनिक खत अथवा औषधांशिवाय १०० टक्के सेंद्रिय चारा.
* हिरव्या चाऱ्याच्या टंचाईवर उपाय.
* भरड धान्याच्या तुलनेत खर्चात बचत.
* वर्षभर उत्पादन शक्य.
चारा टंचाईवर मात
कमी खर्चात, कमी पाण्यावर व शाश्वत पद्धतीने तयार होणारा हायड्रोफोनिक चारा हा चाऱ्याच्या टंचाईवर प्रभावी उत्तर ठरत आहे. यामुळे पशुपालकांनाही दिलासा मिळत असून, जनावरांची तब्येत सुधारण्यास मदत होत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरवा चारा उपलब्ध होत नाही. चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुपालकांनी हायड्रोफोनिक चाऱ्याचा अवलंब करावा. हा चारा शेतकऱ्यांसाठी स्वस्तात आणि जनावरांसाठी पौष्टिक आहे.- डॉ. राजेश सोनोने, पशुविकास अधिकारी, खामगाव