Join us

Goat Farming Disease : शेळ्यांची जीभ निळी पडलीय? निलजीव्हा आजारावर उपाय काय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:06 IST

Goat Farming Disease : या रोगाला 'ब्ल्यू टंग' (Blue Tongue) असेही म्हणतात. या रोगामुळे शेळ्या-मेंढ्यांची जीभ सुजून काळी-निळी पडते.

Goat Farming Disease : नीलजिव्हा (NeelJivha) हा शेळ्या-मेंढ्यांना होणारा एक रोग आहे. या रोगाला 'ब्ल्यू टंग' (Blue Tongue) असेही म्हणतात. या रोगामुळे शेळ्या-मेंढ्यांची जीभ सुजून काळी-निळी पडते. या विषाणूजन्य रोगाची (Goat Farming Desease) लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय काय करावेत, हे जाणून घेऊयात.... 

नीलजिव्हा आजार कशामुळे? 

  • हा रोग ऑरबीव्हायरस या विषाणुमुळे होणारा असंसर्गजन्य रोग आहे. 
  • क्युलीकॉईडस या रक्त पिणाऱ्या डासांच्या माध्यमांतुन प्रसार 
  • या डासांच्या लाळ ग्रंथींमुळे हे विषाणु वाढतात आणि रोग प्रसार होतो. 
  • हा रोग प्रामुख्याने डासांची संख्या वाढल्याने साधारणतः पावसाळ्याच्या शेवटी व हिवाळ्याच्या सुरुवातीस होतो.

 

लक्षणे :

  • रोगाच्या तीव्र स्वरुपात १०४ ते १०६ F इतका ताप ५ ते ७ दिवस असतो. 
  • बाधित शेळ्या-मेंढ्यांच्या नाकातुन स्राव येतो. डोळ्यातून पाणी येते आणि तोंडातुन लाळ गळते. 
  • जीभ सुजून काळी निळी पडते, म्हणुनच या आजाराला ब्लूटंग किंवा नीलजिव्हा असे संबोधले जाते. 
  • जनावरांनाचे तोंड व दाढ सुजते तसेच खुरांवर सूज येते व कधी कधी खुरे वेगळी होतात आणि जनावरे लंगडतात. 
  • गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो.

 

उपचार :

  • हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे यावर विशिष्ट उपचार नाही. 
  • पशुवैदयकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके द्यावीत जेणेकरून दुयय्म जिवाणुजन्य संसर्ग उद्भवणार नाही. 
  • तोंडावर व पायावर झालेल्या जखमा निर्जंतुक पाण्याने धुऊन टाकाव्यात व त्यावर मलम लावावे.

 

प्रतिबंधात्मक उपाय :

  • हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे त्यावरील उपचारापेक्षा प्रतिबंध महत्वाचा आहे. 
  • शेळ्यांना डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात चरावयास पाठवू नये. 
  • साठलेल्या पाण्याची डबकी मुरूम टाकुन बुजवून घ्यावीत.

 

- डॉ. सचिन टेकाडे, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतीशेतकरी