Goat Farming : पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता आणि ओलाव्यामुळे निर्माण होणारी स्थिती शेळ्या-मेंढ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरते. शेळ्यांना पावसाच्या वाऱ्यापासून संरक्षण देणे, योग्य हवा खेळती राहण्याची सोय करणे, व वळईसाठी योग्य प्रतीचा चारा उपलब्ध करणे महत्वाचे असते.
गोठ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. निवाऱ्याची रचना ही पूर्व-पश्चिम बाजूने अशी असावी, ज्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशाने आतमध्ये ओलावा कमी होण्यास मदत होते. जमिनीला थोडासा उतार द्यावा जेणेकरून पाणी साचण्याऐवजी बाहेर वाहून जाईल.
निवाऱ्याचे छत गळती विरहित, पावसाचा जोर झेलणारे आणि गरज असल्यास अर्धवट झुकलेले असावे. पत्र्याचे छत, सीमेंट पत्रे अथवा अन्य जल रोधक साहित्य वापरता येते. भिंती ४ ते ५ फूट उंच व मजबूत असाव्या, त्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. जोराचा वारा व पाऊस आत येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
निवाऱ्याची जागा सीमेंट अथवा मातीवर थर देऊन धुम्मस केलेले असावी, त्यावर नियमितपणे कोरडी वाळू, भुसा किंवा वाळलेल्या गवताचा थर द्यावा. यामुळे चिखल तयार होणार नाही आणि जमिनीत ओलावा राहणार नाही. दररोज निवाऱ्याची साफसफाई करावी. दर आठवड्याला निवाऱ्याचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी चना, फिनेल किंवा इतर पशू खाद्य संरक्षित रसायनांचा वापर करावा.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी