Join us

Goat Farming Diseases : शेळ्यांमधील आंत्रविषार रोगाची लक्षणे आणि उपचार, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:10 IST

Goat Farming Diseases : या आजाराने शेळ्यांचा मृत्यू (Goat Death) होण्याचा धोका असतो, या आजाराची लक्षणे आणि उपाययोजना काय आहेत..

Goat Farming Diseases : शेळ्यांमधील आंत्रविषार (Goat Farming Diseases) हा एक प्राणघातक आजार आहे. हा आजार क्लोस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूंचे शेळ्यांच्या आतड्यात नेहमीच वास्तव्य असते, पण ते कमी प्रमाणात विष तयार करतात.

मात्र, जिवाणूंना पोषक वातावरण मिळाल्यास ते रोगकरकांची उत्पत्ती करून विष तयार करतात आणि शेळ्यांचा मृत्यू (Goat Death) होण्याचा धोका असतो, जाणून घेऊया या आजाराची लक्षणे आणि उपाययोजना... 

रोगाची कारणे : 

  • हे जीवाणु मातीमध्ये व निरोगी जनावरांच्या आतडयामध्ये वास्तव्य करतात. 
  • हा रोग पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. 
  • कारण उन्हाळयात शेळ्यांची उपासमार झालेली असते.  
  • पावसाळ्यात जेव्हा कोवळे गवत जास्त प्रमाणात दिसून येते, तेंव्हा हे गवत भरपुर खाल्ल्यामुळे पोट गच्च भरून पोटात थोडी ही जागा शिल्ल्क राहत नाही. त्यामुळे पोटातील वातावरण ऑक्सिजन विरहित होऊन हे जिवाणु वाढतात व विष तयार होते. 
  • तयार झालेले विष आतडयाद्वारे शोषले जाऊन शेळ्यांना विषबाधा होते व शेळ्या मृत्युमुखी पडतात. 
  • तसेच लहान करडांना जास्त प्रमाणात दुध पाजणे अति कार्बनयुक्त पदार्थ जसे मका, गहु, ज्वारी इ. जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास या रोगांची लक्षणे आढळून येतात.

 

रोगांची लक्षणे :

  • हा अल्पमुदतीचा आजार असून या रोगाची लक्षणे खुप कमी कालावधीतच दिसतात. 
  • लहान करडे/कोकरांमध्ये लागण झाल्यापासून २ ते १२ तासात मृत्यु येतो. 
  • संध्याकाळी शेळ्या, करडे चरून आल्यानंतर त्यांना चक्कर आल्यासारखे दिसते, आणि त्या गोल फिरून पडतात व पाय झाडत प्राण सोडतात.
  • बाधित पिल्लांना पातळ हिरव्या रंगाची हगवण होते.
  • दिर्घकाल पण कमी प्रमाणात विषबाधा झाल्यास शेळ्यांमध्ये आणि करडांमध्ये हगवण आढळून येते.
  • मेलेल्या शेळीचे शवविच्छेदन केल्यास शेळ्यांची/करडांची आतडी रक्ताळलेली किंवा लालसर दिसतात. 
  • मुत्रपिंड थोडेसे मोठे व लाल झालेले आढळते.

उपचार : 

  • या रोगाची लक्षणे किंवा विषबाधा झाल्यावर उपचाराचा फारसा फायदा होत नाही. 
  • तरीही पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे प्रतिजैविके द्यावीत. त्यामुळे पोटातील विष शोषणाचे प्रमाण कमी होते व जिवाणूंची वाढ होणे थांबते.
  • शेळ्यांना आणि करडांना नविन आलेले ताजे गवत, पाला जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. 
  • लहान करडांना गरजेपेक्षा जास्त दुध पाजू नये. 
  • अतिकर्षयुक्त पदार्थ (ज्वारी, मका इ) जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.
  • पावसाळयापुर्वी शेळ्यांना रोग प्रतिबंधक लसीकरण करावे. 
  • पहिल्या मात्रेनंतर १५ दिवसांनी दुसरी मात्रा देणे आवश्यक आहे. 
  • तसेच गाभण शेळ्यांना प्रसुतीपुर्वी तीन ते चार आठवडे आंत्रविषार रोगाचे लसिकरण करून घ्यावे. 
  • शेळीच्या चिकापासून या रोगाविरुदधची प्रतिकारशक्ती करडाला मिळते आणि त्यामुळे करडू जन्मल्यानंतर तीन आठवडे आंत्रविषार या रोगाला बळी पडत नाहीत. 
  • तसेच करडांना २१ दिवसानंतर आंत्रविषार लस टोचावी व पुन्हा १५ दिवसांनी दुसरी मात्रा द्यावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेळीपालनशेतीशेती क्षेत्रदुग्धव्यवसायदूध