Join us

Ghatsarpa Aajar In Goats : शेळ्यांना घटसर्प रोगापासून वाचविण्यासाठी 'हे' कराच, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:50 IST

Ghatsarpa Disease in Goats : घटसर्प (Ghatsarp) हा रोग सर्व ऋतुमध्ये होतो, पण पावसाळयात याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक आहे.

Ghatsarpa Disease in Goats  : घटसर्प (Ghatsarp) हा रोग सर्व ऋतुमध्ये होतो, पण पावसाळयात याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा रोग पाश्चुरेला मल्टीसीडा या जिवाणुमुळे होतो. हा रोग श्वसनसंस्था तसेच आतडयांशी संबंधीत आहे. हा रोग सर्व वयोगटाच्या शेळया/मेंढयामध्ये दिसून येतो. या आजाराची लक्षणे, उपचार आणि घ्यावयाची काळजी (Goat Farming) याबाबत जाणून घेऊयात.. 

रोगप्रसार कसा होतो?   या रोगाचा प्रसार मुख्यत्वे करून बाधित झालेल्या शेळ्यांपासून चारा, पाणी इ. माध्यमातुन होतो.

ही लक्षणे दिसतात 

  • बाधित जनावरांमध्ये उच्च ताप, नाकातुन तसेच डोळयातुन चिकट स्राव किंवा पाणी वाहते. 
  • तोंडातुन लाळ गळते, डोळे लाल होतात, हगवण होते.
  • खाणे पिणे अचानक बंद होऊन अस्वस्थ होते.
  • घशाखाली गळ्याला सूज येऊन घोरल्यासारखा आवाज येतो.
  • श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो व खोकला येतो.
  • शेळ्या गाभण असतील तर गर्भपात होण्याची शक्यता असते.

 

उपचार काय करावेत? 

  • वेळीच सुरवातीस उपचार केल्यास प्रतिसाद चांगला मिळतो. 
  • परंतु ७२ तासांपर्यंत उपचार न केल्यास मृत्यु होतो. 
  • रोगनिदानासाठी शेळया/मेंढ्यांच्या हृदयातील रक्ताचे व नाकातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे. 
  • शवविच्छेदनात सुईच्या टोकाच्या आकाराचे रक्तस्त्राव हृदयाचे, फुप्फुसाचे बाहय आवरण, पोट व आतडयांवर दिसतात.

 

हे प्रतिबंधक उपाय करा 

  • कळपातुन बाधित जनावरे वेगळे करण्यात यावे.
  • बाधित मृत शेळ्यांची योग्य विल्हेवाट लावावी. (जमिनीत पुरून किंवा जाळून)
  • गोठे व आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, तसेच गोठ्यात जंतुनाशक फवारणी नियमितपणे करावी.
  • साथीच्या रोगात शेळ्या/मेंढ्यांचे आठवडी बाजार बंद करावेत. 
  • तसेच नवीन शेळ्या - मेंढयादेखील बाजारातुन आणु नये व आणल्यास पशूवैद्यकांच्या सहाय्याने निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी. 

 

लसीकरण 

हा रोग साथीचा असल्याने ज्या भागात वारंवार या रोगाची साथ येते. त्या भागात शेळी पालकांनी पावसाळ्याच्या सुरवातीला रोगप्रतिबंधक लस टोचुन घेणे फायदयाचे ठरते.

- डॉ. सचिन टेकाडे, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसाय