Fodder Shortage : हिंगोली जिल्ह्यातील पावणेपाच लाख पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पशुसंवर्धन विभागाने चारा मुबलक असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात पशुपालकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.(Fodder Shortage)
हिरव्या चाऱ्याची कमतरता, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान आणि चराऊ क्षेत्रांचा अभाव यामुळे पशुधन सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.(Fodder Shortage)
पशुधन व चाऱ्याची गरज
२० व्या पशुगणनेनुसार हिंगोली जिल्ह्यात एकूण ४ लाख ७७ हजार ५१९ पशुधन आहे. यामध्ये गायी, म्हशी तसेच शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे.
या पशुधनासाठी दररोज सुमारे ४७२५.५८८ मेट्रिक टन हिरवा चारा आणि १८५५ मेट्रिक टन वाळलेला चारा आवश्यक आहे.
पशुसंवर्धन विभागाने २०२५-२६ वर्षासाठी विविध स्रोतांद्वारे वनक्षेत्र, गवती कुरण, पडीक जमीन, कृषी पिकांचे दुय्यम उत्पादन आणि वैरण पिकांद्वारे ९.११ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. विभागाच्या मते हा चारा तब्बल ३७७ दिवस पुरेल इतपत उपलब्ध आहे.
प्रत्यक्षात मात्र वेगळे चित्र
विभागाचा दावा असला तरी जिल्ह्यातील अनेक भागांत गवती कुरण आणि चराऊ क्षेत्रच उरलेले नाही. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने दुय्यम उत्पादनातून मिळणारा चारा कमी झाला. परिणामी, अपेक्षित प्रमाणात वैरण उपलब्ध झाली नाही.
सध्या रब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारी या पिकांपासून मिळणाऱ्या वैरणीवरच पशुपालकांची भिस्त आहे. त्यामुळे '३७७ दिवस पुरेल इतका चारा खरोखर उपलब्ध आहे का?' असा सवाल उपस्थित होत आहे.
वाढत्या तापमानाचा फटका
जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हिरवा चारा अपुरा असल्याने पशुपालकांना जनावरांना सकस आहार देणे कठीण जात आहे. याचा थेट परिणाम दुग्ध उत्पादनावर होत असून दुग्ध व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत.
पशुधनाची संख्या
मोठे पशुधन : २,५५,२७४
लहान पशुधन : ५१,०५४
शेळ्या-मेंढ्या : १,७१,१९१
पुढील काळाची चिंता
सध्या उन्हाळा सुरू असून, जूनअखेरपर्यंत नवीन चारा उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उपलब्ध वैरण किती दिवस पुरेल, याकडे पशुपालकांचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी पशुपालक वैरणीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पशुसंवर्धन विभागाचा 'चारा मुबलक' असल्याचा दावा आणि प्रत्यक्षात भासत असलेली टंचाई यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. आगामी काळात चारा टंचाई तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने ठोस उपाययोजना करून पशुपालकांना दिलासा देणे गरजेचे ठरणार आहे.
अधिक वाचा : Animal Healthcare : पशुपालकांसाठी मोठी खुशखबर; आता मिळणार 'डबल' सुविधा!
Web Summary : Hingoli faces fodder shortage despite official claims of adequacy. Farmers worry about feeding livestock due to scarce grazing lands and crop damage, impacting milk production.
Web Summary : हिंगोली में चारे की कमी, आधिकारिक दावों के बावजूद। चराई भूमि की कमी और फसल क्षति के कारण पशुधन को खिलाने को लेकर किसान चिंतित हैं, जिससे दूध उत्पादन प्रभावित हो रहा है।