Join us

बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 20:30 IST

Diwali 2025 : गुराख्याच्या अंगावरून गोधन चालविण्याची अनोखी परंपरा सुरू आहे.

भंडारा : जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्वत्र विविध पद्धतीने गोधन पूजा केली जाते. मात्र, या विविध पद्धतींमध्ये जमिनीवर पालथे झोपून असलेल्या गुराख्याच्या अंगावरून गोधन चालविण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे १५० वर्षापासून सुरू आहे. यंदाही ही परंपरा पाळण्यात येणार आहे. 

दिवाळी पाडव्याला म्हणजेच बलिप्रतिपदेच्या दिवशी विदर्भात विविध पद्धतीने गोधनाची पूजा करण्याची प्रथा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचे फार महत्त्व आहे. शेतकरी गोठ्याला, घराला झेंडूच्या माळा लावून सजवतो. गुराख्याकडून गावातील सर्व गायींना अंघोळ घातली जाते. गायींना सजवून, नवीन दावे, गेटे, म्होरकी बांधून गेरू व रंगाने अंग, शिंगे रंगविले जातात. त्यानंतर गावातुन मिरवणुक काढली जाते.

यंदा बुधवार २२ ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदेला जांभोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेकी यांच्या अंगावरून २०० गायींचा कळप चालणार आहे. ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.

वारसा तिसऱ्या पिढीकडेतब्बल दीडशे वर्षांपूर्वी गुराखी नारायण परतेकी यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा सुरेश परतेकी यांनी वडिलांची परंपरा सुरू ठेवली. सुरेश परतेकी यांचे वय झाल्यामुळे आता त्यांचा मुलगा विनायक परतेकी ही जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेली परंपरा सुरू चालवत आहे.

अशी जोपासली जाते परंपराबलिप्रतिपदेला गावातील चौकात गोधनाची मिरवणूक आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो आणि वाजत-गाजत गोधन सजविलेला गोधन त्याच्या अंगावरून चालविला जातो. तरीदेखील गुराख्याला इजा होत नाही. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालोरा, जांभोरा परिसरातून नागरिक जांभोरा गावात येतात. ग्रामस्थ राजकीय मतभेद, आपसी वैर बाजूला ठेवत गोधन पूजेला उपस्थित राहतात.

परंपरेमागील गावातील लोकांची मोठी श्रद्धाया परंपरेमागे गावातील लोकांची मोठी श्रद्धा आहे. गोधनाबाबत अनवधानाने काही चुका झाल्यास त्यांची क्षमा मागण्यासाठी ही प्रथा पाळण्यात येते, असे परतेकी परिवार सांगतात. गोवर्धन पूजेच्या दिवशी अंगावरून गायींचा कळप नेल्याने गावावर येणारी सर्व संकटे दूर होतात, तसेच प्रथेचे पालन न केल्यास गावावर संकटे येऊ शकतात, अशी गावकऱ्यांची दृढ धारणा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Unique Tradition: Cows Walk Over Shepherd on Bali Pratipada

Web Summary : For 150 years, Jambhora observes Bali Pratipada with a unique ritual. A shepherd lies down as a herd of cows walks over him. This tradition is rooted in faith, seeking forgiveness and warding off village misfortunes.
टॅग्स :शेती क्षेत्रदिवाळी २०२५शेतकरीभंडारा