Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dairy Farming Success Story : शेतीपूरक व्यवसायातून यश; गांडूळ खत ते दुग्धव्यवसाय प्रवास वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:07 IST

Dairy Farming Success Story : वाशिम जिल्ह्यातील गोभणी येथील एका तरुणाने गांडूळ खत प्रकल्पातून सुरुवात करत दुग्धव्यवसाय उभा केला. आज २३ म्हशींच्या माध्यमातून दररोज १५० लिटर दूध विक्री आणि गांडूळ खत उत्पादनातून लाखोंची कमाई करत त्याने शेतीपूरक व्यवसायाचा यशस्वी फॉर्म्युला साकारला आहे.(Dairy Farming Success Story)

Dairy Farming Success Story : आजच्या काळात अनेक तरुण उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात शहरांकडे वळतात. मात्र काही जण शेती आणि पूरक व्यवसायातूनही यश मिळवण्याचा मार्ग निवडतात. (Dairy Farming Success Story)

वाशिम जिल्ह्यातील गोभणी (ता. रिसोड) येथील युवा शेतकरी योगेश गारडे यांनी याच विचारातून दुग्धव्यवसाय आणि गांडूळ खत प्रकल्प उभा करून यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली आहे. (Dairy Farming Success Story)

जिद्द, चिकाटी आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच स्वतःचा व्यवसाय उभा करत इतर तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

शिक्षणानंतर नोकरीऐवजी शेतीतच संधी

योगेश गारडे यांनी बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कुटुंबाकडे सुमारे सात एकर शेती असून त्यामध्ये खरीप आणि रब्बी हंगामात पारंपरिक पिके घेतली जातात. 

मात्र या पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने योगेश यांनी शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीतूनच प्रगती साधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याची त्यांनी तयारी केली.

सुरुवात गांडूळ खत प्रकल्पापासून

प्रारंभी योगेश यांनी शेतात गांडूळ खत प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पासाठी लागणारे शेण ते सुरुवातीला इतर पशुपालकांकडून विकत घेत होते. मात्र या पद्धतीत खर्च जास्त आणि फायदा कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी स्वतःच पशुपालन करण्याचा निर्णय घेतला.

दुग्धव्यवसायातून मिळाले यश

यानंतर योगेश यांनी टप्प्याटप्प्याने २३ मुन्हा जातीच्या म्हशी खरेदी केल्या. म्हशींसाठी सुमारे पाच हजार चौरस फूट जागेवर आधुनिक गोठा उभारण्यात आला. तसेच पशुखाद्य व कुटार साठवण्यासाठी ३,६०० चौरस फुटांचे शेड तयार करण्यात आले.

या गोठ्यातून दररोज सुमारे १५० लिटर दूध उत्पादन होते. हे दूध ते रिसोड आणि डोणगाव परिसरात विक्री करतात. दुग्धव्यवसायामुळे नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला असून व्यवसाय स्थिरपणे वाढत आहे.

दुहेरी व्यवसायाचा यशस्वी प्रयोग

दुग्धव्यवसायामुळे गोठ्यातून मिळणारे शेण थेट गांडूळ खत प्रकल्पासाठी वापरले जाते. त्यामुळे खत उत्पादनाचा खर्च कमी झाला आणि प्रकल्प अधिक फायदेशीर ठरला. अशा प्रकारे दुग्धव्यवसाय आणि गांडूळ खत उत्पादन या दुहेरी व्यवसायाचा यशस्वी प्रयोग योगेश यांनी करून दाखविला आहे.

वर्षाकाठी हजार बॅग गांडूळ खत विक्री

योगेश गारडे यांच्या गांडूळ खत प्रकल्पातून दरवर्षी हंगामानुसार सुमारे हजार बॅग गांडूळ खताची विक्री केली जाते. या माध्यमातून त्यांना वर्षाकाठी अंदाजे ७ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. याशिवाय दुग्धव्यवसायातूनही नियमित कमाई होत असल्याने आर्थिक स्थैर्य मिळाले आहे.

कुटुंबाचे आणि मार्गदर्शकांचे पाठबळ

या संपूर्ण प्रवासात योगेश यांना त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे सहकार्य लाभले. विशेषतः त्यांचे काका नारायण गारडे (जि. प. शिक्षक) यांचे मार्गदर्शन त्यांना सतत मिळाले. त्यांच्या सल्ल्यामुळे व्यवसायाचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करता आले, असे योगेश सांगतात.

तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण

आज योगेश गारडे यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या बळावर शेतीपूरक व्यवसायात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. उच्चशिक्षण घेतलेल्या तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी शेती आणि पूरक व्यवसायातही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

गोभणी गावातील त्यांची ही प्रयोगशीलता परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी यशकथा ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Dairy Farming Success Story : गोपालनात मोठी कमाई कशी? 'या' अभियंत्याने दिला जिंकण्याचा मंत्र वाचा सविस्तर

अधिक वाचा : Pashupalan Yojana : ग्रामीण तरुणांसाठी गेमचेंजर ठरतेय पशुपालन योजना; जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Dairy Farming Success: From Vermicompost to Thriving Milk Business

Web Summary : Yogesh Garde, an educated farmer from Washim, Maharashtra, achieved success by integrating dairy farming with vermicomposting. He produces 150 liters of milk daily and sells 1000 bags of vermicompost annually, earning significant income and inspiring other rural youth.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती