Join us

'हा' आजार झाल्यास मेंढ्याचा दहा ते बारा तासांत मृत्यू होतो, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 20:30 IST

Sheep Disease : या वातावरणामध्ये शेळ्या, मेंढ्यांना आंत्रविषार आजार होतो. हा जिवाणूजन्य आजार आहे.

Sheep Disease : पावसाळी वातावरणात अचानक बदल होऊन आर्द्रता, दमटपणा वाढतो. या वातावरणामध्ये शेळ्या, मेंढ्यांना आंत्रविषार आजार होतो. हा जिवाणूजन्य आजार आहे. या आजाराचे निदान आणि नियंत्रण कसे करायचे हे समजून घेऊयात.... 

मेंढ्यांमधील आंत्रविषारचे नियंत्रण 

  • पावसाळ्यात उगवलेले कोवळे लुसलुशीत गवत भरपूर प्रमाणात खाल्ल्यामुळे शेळ्या-मेंढ्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
  • हा आजार सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना होतो. परंतु लहान करडे / कोकरांमध्ये मृत्यूदर जास्त दिसून येतो. 
  • हा आजार कमी कालावधीचा आहे. प्रादुर्भाव झाल्यापासून दोन ते बारा तासांत मृत्यू होतो. 
  • शेळ्या-मेंढ्या निस्तेज दिसतात. एका जागेवर बसून राहतात, दूध पीत नाहीत, पातळ हिरव्या रंगाची संडास करतात, तोंडास फेस येतो, फिट येते, बाधित पिल्ले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात, मान वाकडी होते, त्यांचा मृत्यू होतो. 
  • मोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही दिवसांपर्यंत आजारी राहतात. 
  • ज्यामध्ये ताप येणे, तोंडातून फेस येणे, अडखळत चालणे, तोल जाणे, गोल फिरणे, चक्कर येणे तसेच श्वसनास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसतात. 
  • शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, जुलाब ही लक्षणे आढळून येतात. पोट फुगल्यामुळे जनावर उठबस करतात. 
  • सारखे पाय झाडतात. हा अल्प मुदतीचा आजार असल्यामुळे प्रभावी उपचार करणे शक्य होत नाही. यासाठी अधिक खर्चसुद्धा होतो. 
  • आजारी शेळ्या, मेंढ्यांना ताबडतोब वेगळे करून औषधोपचार करावा. 
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने विशिष्ट प्रतिजैविके दिल्यास पोटातील विष शोषण्याचे प्रमाण कमी होते, जिवाणूंची वाढ थांबते. 
  • कळपातील मरतुक कमी होऊ शकते. एखादे लिव्हर टॉनिक व शिरेवाटे ग्लुकोज दिल्यास फायदा होऊ शकतो. 
  • प्रथमोपचार म्हणून लहान पिलांना हगवण सुरू झाल्यानंतर मिठाचे पाणी किंवा इलेक्ट्रोलाईट्सचे द्रावण पाजावे. 
  • आजारास प्रतिबंध करणे अत्यंत सोपे, कमी खर्चाचे व प्रभावी माध्यम आहे. 
  • मुख्यतः लर्सीकरण व व आहारातील व्यवस्थापन करून या आजाराचा प्रादुर्भाव टाळता येतो.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेळीपालनशेतीदुग्धव्यवसायदूधशेती क्षेत्र