Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत जनावरांना लाळ खुरकत, न्यूमोनियासह अतिसारचा धोका, कृषी विभागाचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:55 IST

Animal Winter Care Tips : वाढत्या थंडीमध्ये लाळ खुरकत, न्यूमोनिया, अतिसार अशा आजारांचा धोका बळावू शकतो.

गडचिरोली : सद्यःस्थितीत राज्यभरात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. त्यामुळे जनावरांना विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. अशावेळी पशुपालकांनी जनावरांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो. अशा स्थितीत हिवाळ्यात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. वाढत्या थंडीमध्ये लाळ खुरकत, न्यूमोनिया, अतिसार अशा आजारांचा धोका बळावू शकतो. तेव्हा या आजारांपासून जनावरांचे रक्षण करायचे असेल, तर सर्वप्रथम थंडीपासून त्यांचा बचाव करणे महत्त्वाचे आहे.

थंडीपासून पशुधनाचा बचाव कसा कराल ?हिवाळ्यात गोठी थंड वाऱ्यापासून संरक्षित असावी. गोठीच्या भिंतींना फटी नसाव्यात आणि थंड वारा थेट आत येणार नाही याची काळजी घ्यावी. गोठीत गहू-काड, भुसा, पेंढा किंवा कोरडे गवत पसरावे, जेणेकरून जमिनीचा गारवा जनावरांना लागणार नाही.

जनावरांसाठी संतुलित आहाराचे काय आहे महत्त्व ?काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून, जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या अवकाळी पावसामुळे जनावरांना मोकळ्या जागेत न बांधता गोठ्यात बांधायला हवे. जनावरांच्या आहारात हिरवा चारा यासह उष्णता वाढविणाऱ्या ढेप, सरकी यासह अन्य खाद्यांचा समावेश करायला हवा. वेळोवेळी पाणी सुविधा उपलब्ध करावी, शरीर जितके तंदुरुस्त असेल, तेवढी थंडी कमी वाटते. सकस आहारामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते. 

जंत निर्मूलन व संरक्षण वेळेवर करण्याची गरजथंड वातावरणामुळे जनावरांच्या नाक व डोळ्यांतून पाणी येणे, भूक कमी होणे, थरथर कापणे ही लक्षणे दिसतात. संध्याकाळ होताच जनावरांना गोठ्यामध्ये बांधावे. योग्य निवारा, गाभण गाई-म्हशींची योग्य व्यवस्था, तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण या काळात ठेवावे. वासरांची विशेष काळजी घ्यावी, गोठ्यामध्ये स्वच्छता करावी.

जंतनाशकाने गोठ्याची स्वच्छता करावी, जेणेकरून २ जनावरे आजारी पडणार नाहीत. जनावरांचे वेळेवर जंत निर्मूलन करावे. त्यांना ताजे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. जास्त थंड पाण्याने पोटातील आम्लता वाढते. त्यामुळे उत्पादन व शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

जनावरांच्या संतुलित आहारात हिरवा चारा, खनिज मिश्रण यांसारख्या चाऱ्याचा समावेश असायला हवा. फक्त दुधाळ प्राण्यांना तेल देऊ शकता. न्यूमोनिया टाळण्यासाठी जनावराचे थंड हवेपासून संरक्षण करावे. तेव्हाच जनावरांचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होईल.

थंडीमुळे जनावरांना सर्दी, खोकला, न्यूमोनिया, सांधेदुखी होऊ शकते. दुधाळ जनावरांना बाथा होऊन दूध उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन हिवाळ्यात जनावरांच्या आहाराबाबत व्यवस्थापन करावे.- डॉ. निशिगंधा नैताम, पशुधन विकास अधिकारी, वैरागड 

English
हिंदी सारांश
Web Title : Protect Livestock from Cold: Disease Threat and Prevention Tips

Web Summary : With dropping temperatures, livestock face risks like pneumonia and diarrhea. Protect animals from cold winds, provide balanced diets including green fodder, and ensure timely deworming. Consult veterinary officials for optimal winter care to maintain animal health and milk production.
टॅग्स :थंडीत त्वचेची काळजीदुग्धव्यवसायशेती क्षेत्रशेती